मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली असून अजूनही बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने बचावकार्यासाठी आतापर्यंत कोणती पावलं उचलली आहेत, याबाबत सविस्तर सांगितलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते गिरिश महाजन यांना मध्य प्रदेशमध्ये पाठवण्यात आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माझे बचावकार्यावर लक्ष आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा >>> MP Bus Accident : “अपघाताची घटना अतिशय..,” मध्य प्रदेश बस अपघातानंतर नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख
“मध्य प्रदेशातील धार येथे राज्य परिवहन मंडळाच्या बसचा अपघात झाला. आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह सापडले आहेत. ही अतिशय दुखद घटना आहे. अनेक प्रवासी बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रशासन तत्काळ घटनास्थळी पाठवून कारवाई सुरु केली आहे. कोणाला वाचावता येईल का? यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे. आपलेही काही लोक तेथे पोहोचले आहेत. गिरीश महाजन यांना तातडीने इंदूरला पाठवण्यात आले आहे. या बचाव मोहिमेसाठी मदत करावी, असे त्यांना सांगितले आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा >>> MP Bus Accident: महाराष्ट्राच्या एसटीला मध्यप्रदेशात भीषण अपघात; १३ ठार
“जळगाव जिल्ह्यात बचावकार्यासाठी एक समन्वय केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रातून नातेवाईकांना सर्व माहिती दिली जात आहे. धार येथील जिल्हाधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तेथील परिस्थिती मला दाखवली आहे. सर्व प्रकार अतिशय गंभीर आहे. निश्चितपणे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सामील आहोत. जे बेपत्ता झाले आहेत, त्यांना शोधण्याचे काम सुरु आहे,” असेदेखील फडणवीस यांनी सांगितले.