उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार चंद्रकांत खैरे यांनी काढलेल्या प्रचारफेरीचा खर्च ८७ हजार ४६३ रुपये असल्याचे त्यांनी निवडणूक विभागाला कळविले आहे. या खर्चात चाळीसगावहून आणलेला बॅण्ड आणि ढोलताशांच्या गजराची किंमत लावली नाही. प्रचारफेरी दरम्यान वापरलेल्या काही वस्तूंचा किराया एकत्रित दाखविला गेला, तर काही खर्च निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तपासला जात आहे. ८७ हजारांच्या खर्चात अनामत २५ हजारांचाही समावेश आहे.
उमेदवाराने निवडणुकीचा खर्च सादर करावा, अशा सूचना आयोगाकडून देण्यात आल्या. खर्च तपासणाऱ्या यंत्रणेने ४ एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. शुक्रवारी खैरे व राष्ट्रपती कोंडेकर या २ उमेदवारांनी खर्च सादर केला. अर्ज दाखल करण्याच्या दिवशी काढलेल्या प्रचारफेरीच्या वेळी क्रांती चौक येथे व्यासपीठ उभारले होते. त्याला ५ झेंडे लावले होते. संस्थान गणपतीच्या येथेही ध्वनिक्षेपक, खुच्र्या मांडल्या होत्या. त्याचा एकूण खर्च ७ हजार ५०० रुपये झाला. कटआऊट, बॅचेस, बॅनर, लेटरहेड यावर २६ हजार ६६ रुपये, लहान झेंडय़ांवर ३ हजार ७७५, तर मोठय़ा झेंडय़ांवर २५ हजार रुपये खर्च झाल्याची आकडेवारी देण्यात आली. डिझेलवर साडेतीन हजार, तर पेट्रोलवर ४८७ रुपये खर्च झाले. अनामत रकमेसह झालेला खर्च ८७ हजार ४६३ रुपये दाखविला आहे.
चाळीसगावहून आणलेल्या बॅण्डपथकाचा खर्च मात्र या तपशिलामध्ये दिला नाही. निवडणूक आयोगाने कोणत्या बाबींवर कसा खर्च करावा, याचे दर निश्चित केले आहेत. उमेदवाराने दिलेला खर्च व ठरवून दिलेले दर याची तपासणी केली जाईल आणि त्याचा अहवाल निवडणूक निरीक्षक (वित्त) यांच्याकडे दिला जाणार आहे. प्रचारफेरीच्या वेळी असणारे कॅमेरे आणि दिलेला खर्च तपासला जाईल, असे सांगण्यात आले.

Story img Loader