खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ३ मे नंतर आपली दिशा वेगळी असेल असं मोठं विधान केलं आहे. ३ मे रोजी संभाजीराजेंची खासदारकीची मुदत संपत आहे. त्यामुळे ३ मे नंतर राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे. संभाजीराजेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलं आहे.

मंगळवारी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. मतदानानंतर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी यावेळी ३ मे नंतर माझी राजकीय दिशा स्पष्ट करणार असून ती नक्की वेगळी असेल असं जाहीर केलं. त्यामुळे संभाजीराजे भाजपा, शिवसेना किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करत नवा घरोबा करणार की आपला नवा पक्ष स्थापन करणार, याची चर्चा रंगली आहे.

खासदारकीचा कार्यकाळ संपल्यावर तुमची राजकीय भूमिका काय असेल? असं प्रसारमाध्यमांनी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “वेट अँड वॉच आहे…३ मे रोजी माझी मुदत संपत आहे. निश्चित वेगळी दिशा असणार यामध्ये काही दुमत नाही. पण काय दिशा असणार आहे त्यासाठी वाट पाहूयात. ३ मे नंतर आपण पुन्हा एकदा बोलू”.