संचालक मंडळाच्या निवडणुकीतील एकहाती वर्चस्वाच्या पाश्र्वभूमीवर नगर अर्बन सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सहकार मंडळाचे नेते खासदार दिलीप गांधी यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी राधावल्लभ कासट (संगमनेर) यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी संचालक मंडळ निवडणुकीचे निर्णय अधिकारी एन. एस. खडके यांनी या निवडणुकीच्या निकालाची अधिकृत घोषणा केली.
बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच झाली. मंगळवारी मध्यरात्री मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मल्टिस्टेट बँकांच्या नियमानुसार बुधवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतच खडके यांनी निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला. त्यानंतर बँकेच्या वैकुंठभाई मेहता सभागृहात झालेल्या संचालकांच्या पहिल्याच सभेत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
संचालक मंडळाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते सुवालाल गुंदेचा व गांधी यांच्या नेतृत्वाखालील सहकार मंडळाने सर्व म्हणजे १८ जागा जिंकून एकहाती वर्चस्व निर्माण केले. सभासदांच्या विशेष सर्वसाधारण सभेत बोलताना गांधी यांनी सहकारमंत्री, सहकार न्यायालय, उच्च न्यायलय, सर्वोच्च न्यायालयातील विविध दाव्यांचे निकाल आपल्या बाजूने लागल्यानंतर आता जनतेच्या न्यायालयातही सहकार मंडळाला एकहाती सत्तेच्या रूपाने मोठे यश लाभल्याचे सांगितले. ते म्हणाले, बँकेतच कधीही ४०, ४५ टक्क्यांच्या पुढे मतदान होत नव्हते. मात्र आता बँक मल्टिस्टेट झाल्यामुळे हे मतदान वाढेल, असा विश्वास होता. ते वाढलेही, मात्र अपेक्षेएवढी वाढ झाली नाही, अन्यथा आणखी भरघोस मताधिक्याने सहकार मंडळ विजयी झाले असते. मागच्या पाच वर्षांच्या कारभारावर विश्वास ठेवूनच सभासदांनी हे यश दिले आहे, असे गांधी म्हणाले.
विशेष सर्वसाधारण सभा झाल्यानंतर सहकार सभागृहातून सहकार मंडळाच्या विजयी उमेदवारांची शहरातून मोठी मिरवणूक काढण्यात आली. मंडळाचे समर्थक मोठय़ा संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीनेच हे सर्व बँकेच्या मुख्य कार्यालयात आले. येथे संचालक मंडळाच्या सभेत गांधी व कासट यांची निवड झाल्यानंतर समर्थकांनी पुन्हा जल्लोष केला.
आता ‘अच्छे दिन!’
यंदाच सभासदांना १८ टक्के लाभांश देण्याची घोषणा गांधी यांनी विशेष सर्वसाधारण सभेत बोलताना केली. पुढील वर्षी २० टक्के लाभांश देण्याचेही त्यांनी जाहीर केले. बहुचर्चित वाहन कर्ज प्रकरणात न्यायालयाने वाई बँकेचे अपील फेटाळल्याने हा निर्णय आपल्या बाजूने झाला आहे. तसेच साखर कारखान्यांच्या थकीत कर्जापैकी २ कोटी ७० लाख रुपये मंगळवारीच बँकेत जमा झाल्याचे सांगून ही ‘अच्छे दिन आल्याची’ नांदी आहे, असे ते म्हणाले.

Story img Loader