परभणी: उन्हाळ्यामुळे तापमान वाढल्याने पिकांना पाण्याची निकड असतानाही जायकवाडी प्रकल्पाच्यावतीने पूर्ण क्षमतेने कालव्याद्वारे पाणी सोडले जात नसल्याबद्दल अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणावर टीका करत या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी खासदार संजय जाधव यांनी सोमवारी (दि.17) जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या येथील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी जमा होतील अशी माहिती आज त्यांनी येथे एका पत्रकार बैठकीत दिली. परभणी जिल्ह्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोपही यावेळी खासदार जाधव यांनी केला.

कागदोपत्री परभणी जिल्हा हा जायकवाडीच्या सर्वाधिक लाभक्षेत्राचा जिल्हा असला तरी या जिल्ह्यात शेवटच्या टोकापर्यंत जायकवाडीचे पाणी पोहोचत नाही.शाखा कालवा ६८ चे आवर्तन सध्या सुरू असून त्यासाठी आणखी सहा दिवस लागणार आहेत. सहा दिवसानंतर शाखा कालवा ७०, ६४, व ६७ उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. शाखा कालवा क्रमांक ७० ला ४०० क्युसेक विसर्ग आवश्यक असून ६७ ला २२३ क्युसेक ६४ ला ३५० क्युसेक विसर्ग लागतो असा एकूण ९७३ क्युसिक विसर्ग लागणार आहे. उपसा व वहन व्यय २०० व काही वितरिकांसाठी ६० क्युसेक धरून १२४० क्युसेक इतका स्थिर विसर्ग काटनियमक १२२ ला दोन एप्रिल पर्यंत देण्यात यावा अशी मागणी यावेळी खासदार जाधव यांनी केली. तसेच दिनांक २ एप्रिल पासून शाखा कालवा ५९ चे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे नियोजन असल्याने काटनियमक १२२ ला दिनांक ५ एप्रिल पर्यंत ११४० क्युसेक विसर्ग देण्यात यावा. या प्रकारे सिंचन व्यवस्थापन व नियोजन केल्यासच १७ एप्रिल पर्यंत उन्हाळी हंगामाचे या विभागाचे पहिले आवर्तन पूर्ण होईल. अशी माहिती यावेळी खासदार जाधव यांनी दिली याप्रसंगी गंगाप्रसाद आणेराव, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले आधी उपस्थित होते.

जिल्ह्यात पिक विम्याच्या बाबतीत जो घोटाळा झाला आहे त्याबाबत आपण आवाज उठवला असून याप्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास पुन्हा एकदा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही खासदार संजय जाधव यांनी दिला.

फोटोओळी : खासदार संजय जाधव यांच्यासह शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले.