जालना : ड्रायपोर्ट कार्यान्वित करण्याच्या संदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ‘कुणाचाच पायपोस कुणास नाही’ अशी परिस्थिती अनुभवास आली, असे खासदार डाॅ. कल्याण काळे यांनी शुक्रवारी येथे सांगितले. येत्या वर्षभरात या ठिकाणी आवश्यक कामे पूर्ण होण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला.
ड्रायपोर्टमधील कामाची जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह अन्य संबंधित अधिकाऱ्यांसोबत काळे यांनी पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर खासदार काळे म्हणाले की, ४२५ एकरवरील या प्रकल्पाचा ६३ एकरचा पहिला टप्पा सध्या विकसित करण्याचे नियोजन आह. दिनगाव स्थानक ते ड्रायपोर्ट दरम्यानचा रेल्वेमार्ग, संरक्षक भिंत इत्यादी कामे झालेली असून, गोदाम तसेच प्रशासकीय इमारतीचे काम सुरू आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत ड्रायपोर्ट कार्यान्वित होणार असे संबंधित अधिकारी म्हणत असले तरी आपल्याला त्यामध्ये तथ्य वाटत नाही. या ठिकाणच्या कामांवर आतापर्यंत २६९ कोटी रुपयेे खर्च झालेला आहे. यापैकी ११३ कोटी रुपये भूसंपादनासाठी १२० काेटी रुपये रेल्वेमार्ग आणि रस्त्यांवर खर्च झाले आहेत. याशिवाय अन्य कामांवर ३६ कोटी रुपये खर्च झालेले आहेत.
जवाहरलाल नेहरू पाेर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) च्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टमधील मल्टिमाॅडेल लाॅजिस्टिक पार्क (एमएमएलपी) विकसित करून मालाची चढ-उतार आणि अन्य संबंधित कामे करण्याच्या संदर्भातील कंटेनर काॅर्पोरेशन ऑफ इंडियाशी (क्वाॅन्कर) झालेला करार संपुष्टात आल्याची माहिती बैठकीस उपस्थित असलेल्या जिल्हा पातळीवरील एका वरिष्ठ अधिकाऱ्यालाही माहीत नव्हती. जालना परिसरात अगोदरच मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण असून, ड्रायपोर्टमुळे त्यात आणखी भर पडू नये, याची दक्षता घेण्याची सूचना आपण संबंधित अधिकाऱ्यांना केली. संरक्षक भिंत उभारण्यात आली असली तरी तीन-चार ठिकाणी पडली आहे.
जालना-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर समृद्धी महामार्गास जोडणारा उड्डाणपूल ड्रायपोर्टच्या माध्यमातून करावा, अशी सूचना आपण केली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यास अनुकूलता दर्शविली आहे. जालना, नाशिक येथील प्रकल्पासाठी ‘महाराष्ट्र मल्टिमाॅडेल लाॅजिस्टिक पार्क’ कंपनी स्थापन झालेली असून, त्या माध्यमातून ड्रायपोर्टमध्ये चढ-उताराचे काम होणार आहे, असेही खासदार काळे यांनी सांगितले.
अपूर्ण ड्रायपोर्टचे उद्घाटन
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ड्रायपाेर्टचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. वास्तविक हे काम अपूर्ण असल्याची माहिती दिली नसल्याने त्यांची दिशाभूल झाली असण्याची शक्यता आहे. घाईघाईत ड्रायपोर्टचे उद्घाटन उरकण्यात आले, त्यावेळी तेथे विद्युत पुरवठाही झालेला नव्हता. या प्रकल्पाचा गाजावाजाच अधिक झाला. आता कुठे ‘ड्रायपोर्ट’मध्ये वीज जोडणी देण्याचे काम झाले असून, प्रत्यक्षात वीजपुरवठा सुरू होणे बाकी असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. – डाॅ. कल्याण काळे, खासदार, जालना.