अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात कॉलरेकॉर्डींगवरून पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली होती. घरातून बेपत्ता झालेली मुलगी लव्ह जिहाद प्रकरणात अडकली असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी बाचाबाची करत जोरदार राडा घातला. संबंधित मुलगी सापडली असून ती घरगुती कारणातून एकटीच घरातून निघून गेल्याचं स्पष्ट झालं आहे. या सर्व घडामोडीनंतर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात पोलीस कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. तसेच अनेकांकडून नवनीत राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर जे गुन्हे दाखल होत आहेत. त्यामागे पोलीस आयुक्त आरती सिंग यांचा हात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा – “…तर यांना भाजपात कुणी स्थान देणार नाही”, किशोरी पेडणेकरांचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला!
काय म्हणाल्या नवनीत राणा?
“माझ्यावर जे गुन्हे दाखल होत आहेत, त्यावरून असं दिसतं की पोलीस खात्यात काही मोजके लोक आहेत, ते नेतेगिरी करत आहेत. ते आपल्या खाकी वर्दीचा गैरवापर करत आहेत. आम्ही ज्या कारणासाठी पोलीस ठाण्यात आंदोलन केलं ते सार्थकी लागलं. कारण त्या मुलीचे आईवडील माझ्याकडे येऊन तीन तास रडत होते. त्या मुलीला मी घरी परत आणलं आहे”, अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.
यावेळी त्यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावरही आरोप केले आहे. “माझ्यावर जे गुन्हे दाखल होत आहेत. त्यामागे पोलीस आयुक्त आरती सिंग यांचा हात आहे. मात्र, मी अशा केसेला घाबरत नाही, मी ही लढाई माझ्या नागरिकांच्या न्यायहक्कासाठी लढत आहे”, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, आमदार रवी राणा यांनीही अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. “आरती सिंग यांनी अडीच वर्षांत महिन्याला ७ कोटी रूपये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पोहचवले असून याप्रकरणाची आता उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत”, असे ते म्हणाले.