आज हनुमान जयंती आहे. राज्यभरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज ( ६ एप्रिल ) सामूहिक हनुमान चालिसाचे पठण केले. यानंतर बोलताना नवनीत राणांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘उद्धव ठाकरे, तुम किस खेत की मूली हो’, अशी टीका नवनीत राणांनी केली आहे.
“उद्धव ठाकरे आपले घर सांभाळू शकले नाहीत. ज्या विचारधारांवर तुमचे ४० आमदार निवडून आले, ते तुम्हाला सांभाळता आले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी जिवाचे रान आणि रक्ताचे पाणी केले, ती विचारधारा तुम्ही सांभाळू शकला नाहीत. बाळासाहेब ठाकरेसुद्धा अश्रू ढाळत असतील की ज्या मुलाला जन्म दिला, त्याने माझी विचारधारा ‘मातोश्री’त ठेवली नाही,” असे टीकास्त्र नवनीत राणांनी सोडले आहे.
हेही वाचा : “राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला”, उद्धव ठाकरेंच्या विधानाचा एकनाथ शिंदेंनी घेतला समाचार; म्हणाले…
“महाराष्ट्रात जिथे-जिथे महाविकास आघाडीची सभा होत आहे. तिथे-तिथे उद्धव ठाकरे भाषण करतील त्या प्रत्येक ठिकाणी शुद्धीकरण करीत हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे. जे हनुमान चालिसा आणि प्रभू श्रीरामाला मानत नाहीत, ते ठिकाण अपवित्र होते. त्या ठिकाणाला पवित्र करण्याचे काम महाराष्ट्रातील जनता करेल,” असेही नवनीत राणा म्हणाल्या.
या वेळी तुरुंगातील आठवणीही नवनीत राणांनी सांगितल्या आहेत. “तुरुंग कसा असतो, याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. तुरुंगात टाकल्यानंतर १२ तास उभी राहून विचार करीत होते, पूर्ण आयुष्यात कोणती चूक केली, की असं सरकार माझ्या राज्यात आणि अत्याचारी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले होते,” असं म्हणत नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
“मला १४ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. त्यानंतर आणखी एक महिना ठेवण्यासाठी हालचाली चालू होत्या. तेव्हा माझी मुलेसुद्धा विचारत होती की, आई तू असे काय केलेस? कशासाठी तुला जेलमध्ये टाकण्यात आले,” असे सांगत नवनीत राणा भावुक झाल्या.