शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. आज दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी करण्यात येईल. या अगोदरही राऊतांना याच घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलवण्यात आले होते. या कारवाईमुळे राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. या कारवाईनंतर खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “ही कारवाई अगोदरच व्हायला हवी होती”, असे म्हणत राणा यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत भ्रष्टाचारी नवनीत राणांचा आरोप
“पत्रकार म्हणून सुरुवात करणाऱ्या संजय राऊतांकडे एवढे पैसे आले कुठून. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी पदाचा दुरुपयोग केला. संजय राऊत भ्रष्टाचारी आहेत. या अगोदरच त्यांना अटक करायला हवी होती. हा भ्रष्टाचार विरोधात लढणारा महाराष्ट्र असल्याचे म्हणत नवनीत राणांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. जर चोरी केली नाही तर भीती का वाटते”?, असा सावालही राणांनी राऊतांना विचारला आहे.
संजय राऊतांची महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप
“पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांनी एका महिलेसोबत बोलताना शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. या संभाषणाची ऑडियो क्लिपही व्हायरल झाली आहे. जर तुम्ही स्वच्छ चरित्राचे आहात तर तुम्ही आत्तापर्यंत ईडीसमोर जाऊन आपली बाजू का मांडली नाही. सगळे पुरावे असल्याशिवाय ईडी कोणावरही कारवाई करत नाही. सर्वाच्च न्यायालयानेसुद्धा याबाबत निकाल दिला आहे. संजय राऊत महाविकास आघाडीचे एजंट बनले होते. जवळजवळ २५ ते ३० कंपन्यांमध्ये राऊत भागीदार आहे. संजय राऊतांनी भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे त्यांना अटक होणारच”, असा विश्वासही नवणीत राणांनी व्यक्त केला आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा- “माफियांना आता हिशेब द्यावा लागणार”; ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर निशाणा
राऊतांमुळे शिवसेनेते फूट पडली
संजय राऊतांमुळे आज उद्धव ठाकरे घरी बसले आहेत. शिवसेनेत अनेक नेत्यांसोबत राऊत उद्धटपणे वागायचे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडली. आणि ही कोणत्या पक्षाची लढाई नसून भ्रष्टाचाराविरोधातील लढाई आहे. भाजपा सूडबुद्धीने कारवाई करत नसून उद्धव ठाकरे सूडबुद्धीने कारवाई करत असल्याची टीकाही नवनीत राणांनी केली आहे.