मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सातत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. त्यांना दोन आठवड्यांहून अधिक काळ तुरुंगात जावं लागलं होतं.
या घटनेनंतर राणा दाम्पत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आपली टीकेची तीव्रता वाढली आहे. यानंतर खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरेंनी रक्ताचं पाणी करून उभारलेल्या पक्षाची उद्धव ठाकरेंनी माती केली, अशा शब्दांत नवनीत राणांनी टीकास्त्र सोडलं. त्या एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.
नवनीत राणा म्हणाल्या की, जो भगव्याचा आणि श्रीरामाचा नारा आहे. तो नारा मी कधीच बंद करणार नाही. मग मला यासाठी मला १४ दिवस नव्हे तर १४ वर्षे तुरुंगवास भोगायला लागला तरी चालेल.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना खासदार राणा पुढे म्हणाल्या, “घमंड माणसाला संपवून टाकते, हे मी माझ्या जीवनात ऐकलं होतं. पण उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून मी पहिल्यांदा याचं प्रात्यक्षिक पाहिलं. ५६ वर्षे रक्ताचं पाणी करणाऱ्या आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी विचारधारेशी बांधील राहून पक्ष बनवला. रक्ताचं पाणी करत त्या पक्षाला मजबूत केलं. एवढे खासदार आमदार निवडून आले. पण उद्धव ठाकरेंनी त्याची माती करण्याचं काम केलं.”