खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. खासदार नवनीत राणा यांचा हितचिंतक असणाऱ्या कथित अल्पसंख्यांक व्यक्तीने याबाबत खासदारांना पत्र पाठवून महिती दिली आहे.
“ मी आपल्या शहरातील सर्वसामान्य व्यक्ती आहे. मी शासकीय नोकरी करीत आहे. आपण माझ्या वडिलांची करोना काळात मदत केली होती. काही लोक आपला पाठलाग करीत असल्याची माहिती असून आपण सांभाळून राहावे.” असे या पत्रात नमूद आहे. “अमरावती शहरात राजस्थानच्या सीमेवरून काही संशयीत लोक आले आहेत. हे लोक तुमच्या घरी येऊन गेले आहेत.” असा उल्लेख देखील या पत्रात आहे.
पत्राच्या शेवटी खुदा हाफिज, असे लिहिले आहे. खासदार नवनीत राणा या सध्या दिल्लीत असून त्यांची प्रतिक्रिया लगेच कळू शकले नाही. हे पत्र नवनीत राणा यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसारीत करण्यात आले आहे.