अहिल्यानगरः ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांना २४ तास वीज मिळावी यासाठी, गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित ‘आरडीएसएस सिंगल फेज’ योजनेचे काम पुर्ण करण्यात होणार्या दिरंगाईकडे खासदार निलेश लंके यांनी संसदेच्या  उर्जा समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करताच केंद्रीय उर्जा समितीच्या अधिकाऱ्यांनी पारनेरमध्ये (अहिल्यानगर) धाव घेत या कामाचा आढावा घेतला. 

केंद्रीय उर्जा समितीचे सदस्य असलेल्या खासदार लंके यांनी समितीच्या बैठकीत सिंगल फेज योजनेसह महावितरणच्या कामातील दिरंगाईबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेत केंद्रीय उर्जा विभागाचे वरीष्ठ अधिकारी अहिल्यानगरमध्ये दाखल झाले. महावितरणच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना घेऊन ते पारनेरमध्ये गेले. खासदार लंके यांच्यासमवेत बैठक घेत विशेषतः सिंगल फेज योजनेचा आढावा घेतला.

या प्रश्नासंदर्भात दिल्लीत सबंधित ठेकेदाराच्या उपास्थितीत बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्याची ग्वाही केंद्रीय उर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. केंद्रीय उर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसह अधीक्षक अभियंता रमेश पवार, अधीक्षक अभियंता (आराखडा) श्री. ढोबळे, कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण, उपभियंता हतोळकर यांच्यासह दिल्लीच्या पॉवर फायनान्स कार्पोरेशनचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

ठेकेदाराकडे क्षमता नाही

अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आरडीएसएस योजेअंतर्गत सिगल फेज योजना राबविण्यासाठी ७०० कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी या योजनेची निविदा मंजुर झाली. मात्र हे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे पुरेसे मनुष्यबळ अथवा सामुग्री नसल्याने हे काम रेंगाळल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

दिल्लीत पुन्हा बैठक 

सिंगल फेज योजनेच्या प्रश्नावर दिल्ली येथे ठेकेदाराच्या उपास्थितीत बैठक घेण्यात येईल. या बैठकीत ठेकेदाराकडून तातडीने काम करण्याची हमी घेण्यात येईल, ठेकेदाराकडून त्यात कुचराई झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असेही या बैठकीत केंद्रीय उर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याचे खासदार लंके यांनी सांगितले.

शेती पंपांना दिवसा वीज हवी 

महावितरणकडून शेती पंपांसाठी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा करण्यात येतो. अहिल्यानगरमध्ये अनेक भागात बिबटया तसेच अन्य वन्य प्राण्यांची संख्या मोठी असून त्यांच्यापासून शेतकऱ्यांना धोका आहे. त्यासाठी शेतीपंपांना आठवडाभर रात्रीऐवजी दिवसा काहीकाळ वीजपुरवठा करता येईल का याची चाचपणी करण्याच्या सुचना खा. लंके यांनी यावेळी केली तसेच सिंगल फेज योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने कामाचा वेग वाढविला नाही तर त्यास काळ्या यादीत टाकण्याची सूचना लंके यांनी केली.

Story img Loader