अलिबाग – देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मुंबईला लागून असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ७ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज पत्रकार परिषद घेवून प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली. रायगड जिल्ह्यात मावळ आणि रायगड अशा दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर या विधानसभा मतदारसघांचा समावेश आहे. निवडवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.
हेही वाचा – जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कोण याचा तिढा सुटेना
महिला मतदारांच्या हाती नाडी
रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लाख ५३ हजार ९३५ मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या ८ लाख १३ हजार ५१५ आहे तर स्त्री मतदारांची संख्या ८ लाख ४० हजार ४१६ आहे. शिवाय ४ तृतीयपंथी मतदार आहेत. पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या २६ हजार ९०१ ने अधिक आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकसभेत रायगडचा खासदार कोण पाठवायचा हे ठरवण्यात महिला मतदार निर्णायक भूमिकेत असणार आहेत.
८५ पेक्षा अधिक वय असलेले ३७ हजार मतदार…
निवडणूक आयोगाने दिव्यांग आणि ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारांना घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यात ११ हजार २८२ दिव्यांग मतदार आहेत तर ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ३७ हजार ७३६ मतदार आहेत. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्प तसेच व्हीलचेअरची व्यवसथा असेल तर ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मतदारांना घरी बसून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
हेही वाचा – विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या दबावापुढे न झुकण्याची भाजपची भूमिका
अडीच हजारहून अधिक मतदान केंद्र
रायगड जिल्ह्यात २ हजार ६९४ मतदान केंद्र असून त्यातील केवळ ६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. तर रायगड लोकसभा मतदारसंघात २ हजार १८५ मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात निवडणूक आयोगाने ७ हजार ५२ मतदान यंत्रे , ४ हजार ४५ कंट्रोल युनिट आणि ४ हजार २२२ व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १३ हजार ५०० कर्मचाऱ्यांची गरज बसून जिल्ह्यात २७ हजार कर्मचारी उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
पोलीस यंत्रणेची तयारी
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. यात ९० टक्के लोकांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. अंमली पदार्थ, रोख रकमेची वाहतूक, वाटप, दारूचे वाटप वाहतूक यावर पोलिसांची नजर राहणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिंबधात्मक कारवाई केली जाणार आहे. शस्त्रास्त्र परवाना असलेल्या व्यक्तींकडून शस्त्रास्त्रे जमा केली जाणार असल्याचे घार्गे यांनी सांगितले.