बाळासाहेबांची शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ५० खोके घेणाऱ्या आमदारांची SIT मार्फत चौकशी करा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. यावर खासदार प्रतापराव जाधव यांनीही प्रत्युत्तर देत महाविकास आघाडीच्या काळातील १०० खोक्यांबाबतही SIT चौकशीची मागणी करा असं प्रत्युत्तर दिलं आहे. याशिवाय प्रतापराव जाधवांनी संजय राऊतांवर टीकाही केली आहे.
संजय राऊतांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांसमोर बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले, “संजय राऊतांच्या आरोपाला या महाराष्ट्रात कोणीही गांभीर्याने घेत नाही. कारण, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत संजय राऊतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा यांच्यावर आरोप केल्याशिवाय दुसरा कोणताही धंदा आजच्या परिस्थितीत शिल्लक राहिलेला नाही.”
याशिवाय, “५० खोक्यांच्या संदर्भात त्यांच्याजवळ जर काही पुरावे असतील, तर ते सर्व पुरावे त्यांनी शासनाकडे द्यावेत. मला खात्री आहे की आमचं हे शिवसेना-भाजपा युतीचं सरकार, त्या पुराव्यांना घेऊन निर्भिडपणे आणि निपक्षपातीपणे सुद्धा त्या गोष्टीची चौकशी केल्याशिवाय राहणार नाही. पण तसे पुरावे संजय राऊतांनी सादर केले पाहिजेत.” असंही आव्हानही खासदार जाधव यांनी राऊतांना केलं.
याचबरोबर “खरंतर माझा संजय राऊतांना सल्ला आहे की या ५० खोक्यांबाबत तुम्ही एसआयटी चौकशीची मागणी करतात, मग ही एकदा चौकशी मागा की ज्या १०० खोक्यांच्या आरोपाखाली सचिन वाझे, अनिल देशमुख हे आज तुरुंगात आहेत. त्या १०० खोक्यांची एसआयटी मार्फत चौकशी करून, ते कोणाच्या बंगल्यापर्यंत पोहचणार होते. या संदर्भातील सुद्धा एसआयटी चौकशीची मागणी संजय राऊतांनी करावी.” असा सल्लाही प्रतापराव जाधवांनी राऊतांना दिला.
हेही वाचा – राज्यपालांविरोधात अमरावतीत शिवसैनिक आक्रमक; चपला दाखवून केला निषेध!
“संजय राऊतांना सत्ता गेल्यापासून ज्याप्रमाणे मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी पाण्यात दिसायचे. तसं मला वाटतंय की आज संजय राऊतांना स्वप्नात, जळी-स्थळी सगळ्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिसतात की काय? अशी शंका मला व सगळ्यांना आल्याशिवाय राहत नाही.” अशा शब्दांमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊतांना टोला लगावला.