Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार येणार असा दावा केला आहे. तसंच संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी अजित पवार यांच्या बाबतीतही मोठा दावा केला आहे. भाजपा, महायुती हे निवडणूक घ्यायला घाबरत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्राची निवडणूक घेण्याची इच्छा नसली तरीही भाजपाला आणि महायुतीला निवडणूक घ्यावीच लागेल. निवडणुकीच्या तारखा मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी सोयीच्या तारखा घेतल्या होत्या. मात्र जनता आणि आम्ही जागरुक आहोत. आम्हाला खोकेवाल्यांचं सरकार घालवायचं आहे. त्यामुळे नवं सरकार आलं पाहिजे यासाठी निवडणूक भाजपा, महायुतीला घ्यावीच लागेल कितीही इच्छा नसली तरीही असं संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

हे पण वाचा- “शिंदेंच्या हाताखाली काम करावं लागण हे कर्माचं फळ, फडणवीस असे अर्धवट…”, संजय राऊतांची ‘रोखठोक’ टीका

लोकसभेतला सर्व्हे महायुतीच्या बाजूने होता पण काही उपयोग झाला नाही

लोकसभेतला सर्व्हे त्यांच्या बाजूने होता. पण त्याचा त्यांना उपयोग झाला नाही. महाराष्ट्रातला सर्व्हे हात तर प्रतिकूल आहे. महाराष्ट्रात ठाकरे २ सरकार येणार, ठाकरे २ हे एक उदाहरण आहे. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ठाकरे १ सरकार मविआचं होतं. आता मविआचं सरकार येण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. कुणी किती पैसे वाटा, योजना आणा, धुरळा उडवा. निवडणूक वेळेत घ्यावी लागेल आणि आमचं सरकार येईल असंही राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

रवी राणांचं वक्तव्यच सांगून जातं आहे की लाडकी बहीण योजना कशासाठी?

रवी राणांनी १५०० रुपये परत घेण्याचं वक्तव्य केलं आहे, याचाच अर्थ असा आहे की या ज्या लाडकी बहीणसारख्या योजना आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी नाहीत. विधवा, परितक्त्या यांच्यासाठी नसून ही योजना फक्त मतं विकत घेण्यासाठीची आहे. या सरकारच्या भावना किती कलुषित आहेत हे दिसून येतं. पैसे काय त्यांच्या खिशातले आले का? रवी राणांच्या पत्नी पराभूत झाल्या आहेत, त्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल. असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले

मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना

रवी राणाच नाही तर महाराष्ट्रातले नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा बोलत आहेत की १५०० रुपये देतो आहे, मतं द्या नाहीतर पैसे परत घेऊ. हे पैसे त्यांच्या बापजाद्यांचे आहेत का? हा सरकारचा पैसा नाही, करातून आलेला पैसा आहे. यांची मानसिकता भ्रष्ट आहे. सरकारी पैशांतून त्यांना मतं विकत घ्यायची आहेत. आमचं सरकार येईल तेव्हा १५०० रुपयांत नक्की वाढ करु. असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

अजित पवारांबाबत राऊतांचा मोठा दावा

लाडकी बहीण योजना चांगल्या हेतूने आणलेली नाही. ही योजना फक्त मतं विकत घ्यायला आणली आहे. अजित पवार बारामतीत पराभूत होणार आहेत. बारामतीच्या लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करणार आहेत. महाराष्ट्रात जे सगळे गद्दार आमदार ते निवडणुकीनंतर विधानसभेत दिसणार नाहीत. लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव आहेत. लाडक्या बहिणी लाचार नाहीत, त्यांच्या बाबत बोलणारे सगळे लोचट मजनू आहेत. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. असा टोलाही संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp sanjay raut big claim about ajit pawar he said this thing about him scj