लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार गटाकडून राज्यसभेच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचं नाव चर्चेत होतं. मात्र, सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली. अशातच छगन भुजबळ यांनी महायुतीच्या धोरणाविरोधात अनेकदा भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. असे असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत बोलताना मोठं विधान केलं आहे. “छगन भुजबळ शिवसेनेत (ठाकरे गटात) असते तर आतापर्यंत मुख्यमंत्री पदाचा टीळा लागला असता”, असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.
संजय राऊत काय म्हणाले?
काही नेते संपर्कात आहेत का? या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, “या विषयावर जाहीर बोलण्याची आवश्यकता नाही. मुळात तुम्ही ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जो पक्ष आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. हे लोकांनी सिद्ध केलं आहे. आता अमित शाहांनी धनुष्यबाण दिलं म्हणून शिवसेना म्हणता आणि घड्याळ म्हणता. पण ते खरे पक्ष नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे, ती खरी शिवसेना आहे. दोन चार जागा जिंकल्या असतील, पैसे आहेत, यंत्रणा आहे, मग अस्वस्थता कशासाठी आहे. हे फक्त बुडबुडे आहेत. पावसाळ्यात बेडूक येतो आणि नंतर निघून जातो. तसं त्यांचं झालं आहे”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटावर केला.
हेही वाचा : “छगन भुजबळांच्या भूमिका गोंधळलेल्या”, संजय शिरसाटांचं मोठं विधान; म्हणाले, “ते आजकाल उबाठा गटाची…”
संजय राऊत भुजबळांबाबत काय म्हणाले?
“ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणात आणि त्यांच्या आयुष्यात कधीही स्वस्थ आणि शांत झालेले नाहीत. आता छगन भुजबळ शिवसेनेत (ठाकरे गटात) असते तर आतापर्यंत मुख्यमंत्री पदाचा टीळा लावून बाहेर पडले असते. असे अनेक आहेत. नारायण राणे, एकनाथ शिंदे हे सर्व अस्वस्थ आत्मे आहेत. हे अस्वस्थ आत्मे म्हणून आणि भटकते आत्म म्हणून फिरत आहेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
अजित पवार गट आणि शिंदे गट पक्ष नाहीत
“लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे जे लोक जिंकले आहेत, ते भाजपाचे मते आहेत. तसेच अजित पवार गट असेल किंवा शिंदे गट असेल हे दोन्हीही गट आहेत. त्यांना पक्ष म्हणून जनता कधीही मान्यता देणार नाही. विजय विकत घेतला जातो, त्या पद्धतीने ते जिंकले आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडे जे लोक गेले आहेत. त्यांची लोकसभेच्या निकालानंतर अस्वस्थता स्पष्ट दिसून येत आहे. मात्र, तो त्यांचा प्रश्न आहे”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.