लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा दौरे सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमधील विविध गावांचा दौरा सुरू करत शेतकरी मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शरद पवारांनी आता मिशन बारामती विधानसभा हाती घेतल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. नणंद विरुद्ध भावजय असा हा सामना रंगला होता. त्यामुळे बारामतीच्या निवडणुकीची देशात चर्चा होती. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोर जावं लागलं. आता शरद पवार यांनी बारामतीमधील दौऱ्यादरम्यान संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. ‘सुडाचं राजकारण आपण कधी करत नाही. मात्र, बारामतीत नेत्याचं दुकान काही चाललं नाही’, असा टोला नाव न घेता शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला.

हेही वाचा : “..तर उद्धव ठाकरेंना नक्कीच फायदा होईल”, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवार काय म्हणाले?

“लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कुठंही गेलं तरी बारामतीत काय होणार? याची चर्चा असायची. दिल्लीत गेलो तरीही बारामतीची चर्चा असायची. परदेशात सुद्धा बारामतीची चर्चा झाली. लोकांना चिंता वाटायची. पण बारामतीकर जो निकाल द्यायचा तो निकाल देतात. ज्यावेळी मतपेटी उघडली तेव्हा बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना ४० ते ४५ हजार मताधिक्यांनी विजयी केलं. मी तुम्हाला खात्री देतो की देशाच्या लोकसभेत तुमच्या मतदारसंघाचं नाव गाजल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला त्याच समाधान मिळेल”, असं शरद पवार म्हणाले.

“मी तुम्हाला खात्री देतो कोणाचा किती विरोध असला तरी तो विरोध तुम्ही लोकांनी लक्षात ठेवला नाही. मी यावेळी अनेक गावात जातो आहे. गावातील लोक सांगतात निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध झाला. पण मी सांगतो विरोध झाला तर विसरून जायचं. सुडाचं राजकारण आपण कधी करत नाही. पण एक गोष्ट आहे. बारामती तालुक्यातील जनतेनं सिंद्ध केलं की नेते गावातले होते. पण त्यांचं दुकान काही चाललं नाही. सामान्य माणसांचं आणि साध्या माणसांचं दुकान जोरात चाललं. त्यामुळे नवी पिढी पढे आली. त्या माध्यमातून गावाचा विकास कसा होईल. ही जबाबदारी आमची राहिल. ज्यांनी निवडणुकीत जबाबदारी घेतली त्यांना ताकद देण्याच काम आम्ही करू”, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केलं.