लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा दौरे सुरू केले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बारामतीमधील विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांचे मेळावे घेत आहेत. आज त्यांनी बारामतीमधील काटेवाडी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी लोकसभा निवडणूक कशी झाली? तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या महाराष्ट्रातील सभा, अशा विविध विषयांवर भाष्य केलं. ‘लोकसभेची निवडणूक साधी सोपी नव्हती, पण बारामतीकर साथ सोडणार नाहीत हा विश्वास होता’, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
“यावर्षीची लोकसभेची निवडणूक वेगळी होती. लोक विचारायचे की बारामतीत काय होतंय? ठीक आहे का? अमेरिकेत बारामतीची चर्चा असायची. दिल्ली किंवा कोणत्याही राज्यात गेलं तर बारामतीची चर्चा असायची. लोकांना काळजी वाटायची. लोक मला खासगीत काहीतरी वेगळं सांगायचे. मात्र, माझं मन मला सांगायचं की, बारामतीकर कधी साथ सोडणार नाहीत. माझ मन जे सांगायचं ते शेवटी खरं झालं. ही निवडणूक संघर्षातून केली. दोन चार ठिकाणी काही मते कमी पडली असतील. लोक म्हणायचे की येथे काहीच मते पडणार नाहीत, मात्र तेथेच चांगली मते पडली. ही निवडणूक साधी सोपी नव्हती”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “छगन भुजबळ पक्ष सोडणार, त्यांच्याबरोबर…”, रोहित पवारांचा दावा; पक्षांतराची वेळही सांगितली
“बारामतीच्या निवडणुकीत मी जास्त येत नसायचो. एकदा प्रचाराचा नारळ फोडला की, निवडणूक तुमच्या हातात आणि मी महाराष्ट्रात जायचो. या वर्षीही काही प्रमाणात तसंच होतं. पण ही संघर्षाची निवडणूक होती. यावेळी एक प्रकारची शक्ती दिल्लीपासून लावण्यात आली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात माळशिरस, कराड, अहमदनगर, नाशिकसह अनेक ठिकाणी आले. मोदी महाराष्ट्रात आले की एकच विषय असायचा, फक्त शरद पवार. देशाचे पंतप्रधान जवळपास निम्या वेळेपेक्षा जास्त माझं नाव घेतात ही काय साधी गोष्ट आहे का? त्यांना काटेवाडीकरांचा चमत्कार कळला”, असा हल्लाबोल शरद पवारांनी मोदींवर केला.
पवार पुढं म्हणाले, “मोदी कुठेही गेले तरी माझ्याबद्दल बोलत होते. आता मी सांगतो की पुढच्या निवडणुका असल्या की मोदीसाहेब आमच्याकडे लक्ष ठेवत जा. त्यांनी लक्ष ठेवलं, टीका टिप्पणी केली की मतं आपल्याकडे येतात. हे आपण लोकसभा निवडणुकीत पाहिलं. आता निवडणूक झाली, पाठिमागच्या गोष्टी काढायच्या नाहीत. आपण काम करत राहायचं. सुप्रिया सुळे यांना तुम्ही निवडून दिलं. हे सर्व श्रेय तुम्हा लोकांचं आहे. मी नेहमी सांगतो आपल्या देशात लोकशाही आहे. येथे हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न काहींचा होता. सर्वसामान्य लोकांमुळे लोकशाही टीकली. कारण तुम्ही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न हानून पाडला”, असंही शरद पवार म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd