समाजवादी जनता परिवारच्या २१ पक्षांची बैठक मुंबईत पार पडली. या २१ पक्षांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीत उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘माजी मुख्यमंत्री’ करण्यात आला. ‘मुख्यमंत्री होतो तेव्हा लाडका होतो. कुणालाही राज्याचं लाडकं मुख्यमंत्री म्हटलं जातं. पण, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री, असं कुणी म्हणत नाही. मला कुटुंबप्रमुख मानता हे, महत्वाचं आहे,’ असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
ठाण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “माजी मुख्यमंत्री कुणी केलं, हे त्यांनी विसरू नये. कुणाला मुख्यमंत्री बसवायचं आणि कुणाला खाली उतरवायचं हे जनता ठरवत असते. गेली दीड वर्षे टिका-टिप्पणीशिवाय त्यांनी काय केलं नाही.”
हेही वाचा : VIDEO : “…तेव्हापासून हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार ठाकरेंना राहिला नाही”, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
“बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे कधीच विसरले आहेत. मला कळलं समाजवादी पक्षांना यांनी घरी बोलावलं होतं. उद्या एमआयएमलाही घरी बोलावलं, तर नवल वाटायला नको. कारण, त्यांनी नितीमत्ता सोडली आहे. हे सगळं शिवसैनिक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांना तोडून-मोडून फेकून दिलं आहे,” असा हल्लाबोलही श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला.
“राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल अपशब्द वापरतात. राहुल गांधींना कधी सवाल विचारण्याची यांची हिंमत झाली नाही. राहुल गांधींनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे. उद्या यांनीही पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला, तर आश्चर्य वाटायला नको. दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि समाजवादी पक्षांना स्टेजवर बसवावं,” असं आव्हान श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं.
हेही वाचा : “सदावर्तेंनी आमचा नाद करू नये, तर भुजबळांनी कधीच…”, नरेंद्र पाटलांचा हल्लाबोल
“सरकार सामाजिक उपक्रम राबवत आहे. ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रमचं कौतुक होत आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून दीड कोटी नागरिकांना लाभ भेटला आहे. आपण टीका करत राहा. आम्ही काम करत राहू,” असेही श्रीकांत शिंदे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले.