MP Shrikant Shinde Shivsena: शिवसेना (एकनाथ शिंदे) खासदार श्रीकांत शिंदे यांनी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन व पूजाविधी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यावर गेल्या वर्षभरापासून बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील श्रीकांत शिंदे यांनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं जात असून व्हिआयपी संस्कृतीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यासंदर्भातले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इकोनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

व्हिडीओमध्ये काय?

सोशल मीडियावर उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गाभाऱ्यातील व्यवस्थापन व शिवलिंगाचा अभिषेक आदी गोष्टींची जबाबदारी असणारे पुजारी दिसत आहेत. मात्र, त्याचबरोबर गाभाऱ्यात इतर काही व्यक्तीही दिसत आहेत. यातच खासदार श्रीकांत शिंदे व त्यांच्या पत्नीदेखील असल्याचा दावा व्हिडीओवरून करण्यात येत आहे. यावरून सध्या वाद निर्माण झाला असून सामान्य भक्तांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन वा पूजा करण्यास बंदी असताना उच्चपदस्थ नेतेमंडळींना प्रवेश कसा दिला जातो? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

विरोधकांची टीका

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत खुलासा होऊ शकला नसला, तरी तो शुक्रवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असोत किंवा भाजपाचे इतर मंत्री किंवा नेतेमंडळी असोत, दादागिरी करून गाभाऱ्यात जातात. मला वाटतं की हे राजेशाहीत जगत आहेत. एकीकडे ज्यांच्या मतांच्या जोरावर हे खासदार-लोकप्रतिनिधी झाले, ते ५० फूट लांबून दर्शन घेतात. त्यासाठी ६ ते ८ किलोमीटर चालत येतात. त्यामुळे मला वाटतं हे १०० वर्षांपूर्वीच्या राजेशाहीत जगत आहेत. प्रभू महाकालेश्वर यांना सुबुद्धी देवो”, अशी टीका काँग्रेसचे स्थानिक आमदार महेश परमार यांनी केली आहे.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान; म्हणाले, “मुलाशी काय भिडता? बापाशी…”

प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश

दरम्यान, महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती, त्यासंदर्भात हे कसं घडलं याची चौकशी करण्याचे निर्देश उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे.

का आहे गाभाऱ्यात जाण्यावर बंदी?

साधारण वर्षभरापूर्वीपर्यंत महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भाविकांना दर्शन घेता येत होतं. पण शिवलिंगाच्या संरक्षणासाठी व गाभाऱ्यात अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्यामुळे त्यावरून वाद निर्माण झाला आहे.