महाराष्ट्रात १० दिवसांपासून सुरु असलेल्या गणेश उत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीच्या दिवशी झाली. साश्रू नयनांनी लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानीही गणरायाचं आगमन झालं होतं. गणरायाच्या विसर्जनासाठी जो कृत्रिम हौद वर्षा बंगल्यावर तयार करण्यात आला होता त्या हौदात उतरुन खासदार श्रीकांत शिंदे गणपतीचं विसर्जन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे फोटो X वर (ट्विटर) पोस्ट केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं आहे?
वर्षा बंगल्याच्या आवारात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात पर्यावरणपूरक पद्धतीने श्रींचे विसर्जन करण्यात आले. आज देवाची आरास रिकामी असली तरी या दहा दिवसांच्या स्मृतींनी मनाचा गाभारा पूर्ण भरलेला आहे. याच स्मृतींना सोबत घेऊन पुढे जाताना एक नवीन महाराष्ट्र घडवण्याची ऊर्जा बाप्पाने मला दिली आहे. हे उद्दिष्ट साध्य करताना मी उतू अथवा मातू न जाता सतत कार्यरत रहावे यासाठी लागणारे बळ मला विधात्याने द्यावं एवढेच मागणे मी त्याच्याकडे मागितले आहे.
गणपतीला निरोप देताना सगळ्यांचेच डोळे पाणवतात. तसेच श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही डोळे पाणावले होते. गुरुवारी म्हणजेच २८ सप्टेंबरच्या दिवशी लाडक्या गणपतीला निरोप देत असताना महाराष्ट्रातल्या तमाम गणेश भक्तांच्या डोळ्यात पाणी आलंं होतं. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा गजर आसमंत दणाणून टाकत होता. अनेक ठिकाणी तलाव, नदी या ठिकाणी गणपतीचं विसर्जन करण्यात आलंं. तर वर्षा बंगल्यासह मुंबई आणि उपनगरांमध्ये अनेक भागांमध्ये कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले होते. या तलावांमध्ये घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. स्वयंसेवक ज्याप्रमाणे पाण्यात उतरुन गणपतीचं विसर्जन करतात त्याचप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात उतरुन गणपतीला निरोप दिला. तो क्षण सगळ्यांनाच भावूक करणारा होता.