खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. राऊत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली.
काय म्हणाले संजय राऊत?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली होती. माझी त्याबद्दल तक्रार नाही. मात्र, मला एक गंभीर बाब तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीला माझावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण बघता हा विषय आपल्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे, असे राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांनाही लिहिले पत्र
दरम्यान, यासंदर्भात संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांनाही पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटविण्यात आली होती. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंडांच्या टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले आहेत. मी याबाबत आपणास वेळोवेळी माहिती दिली आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे. ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर याला माझावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, ‘सामना’चा कार्यकारी संपादक, तसेच एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे, असं संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.