देशात ‘द केरला स्टोरी’वरून राजकारण तापलं आहे. त्यातच शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी ( २६ मे ) मोठी घोषणा केली. देशात केरला स्टोरीसारखे चित्रपट येत असतील, तर आम्हीही ‘डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ असा चित्रपट काढणार आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं. याला आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
“देशात ‘केरला स्टोरी’सारखे चित्रपट येत असतील, तर आम्हीही ‘डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ असा चित्रपट काढणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रींना याची स्टोरी देणार आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट असेल. त्यात माणसं कमी आणि खोके जास्त असतील,” असा टोलाही संजय राऊतांनी शिंदे गटाला लगावला आहे.
“आम्ही महाराष्ट्राची संस्कृती अबाधित ठेवण्याचं काम करतोय”
याबद्दल नांदेड येथे प्रसारमाध्यमांनी श्रीकांत शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, “गेली अनेक वर्ष खोके कोणी घेतले हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही महाराष्ट्राची संस्कृती अबाधित ठेवण्याचं काम करतोय. विरोधक खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत.”
“आम्हाला त्यांच्यासारखी टीका करायची नाही आहे. चिखलात दगड मारल्यावर चिखल आपल्यावरच उडतो. आम्हाला काम करत राहायचं आहे,” असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “संजय राऊत हे गौतमी पाटील पेक्षा फार…”, संजय शिरसाटांनी उडवली खिल्ली
“‘माकडाच्या हातात कोलीत-संजय राऊत’ असा चित्रपट…”
संजय राऊतांच्या वक्तव्यावर आमदार शहाजीबापू पाटील यांनीही टीकास्र डागलं आहे. “खोके-खोके म्हणत संजय राऊत दगडं मारत फिरणार आहेत. राऊतांना कावीळ झाली आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसारख्या माणसाच्या हातात कोलीत दिलं आहे. ते महाराष्ट्रात भांडण लावत हिंडत आहेत. त्यामुळे ‘माकडाच्या हातात कोलीत-संजय राऊत’ असा चित्रपट तुम्हाला दिसेन,” असं शहाजीबापू पाटलांनी सांगितलं.