जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी महाराष्ट्र सदनासंदर्भात केलेल्या एका विधानावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यासंदर्भात रविवारी होळीच्या कार्यक्रमानिमित्त कल्याणमध्ये आलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तसेच, या मुद्द्यावरून श्रीकांत शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील महाराष्ट्र सदनावरून राज्याच्या राजकारणात वातावरण तापण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
काय म्हणाले ओमर अब्दुल्ला?
जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला आहे. मात्र, महाराष्ट्र सदनाला ओमर अब्दुल्लांनी विरोध केला आहे. जर काश्मीरमध्ये आपण सत्तेवर आलो, तर महाराष्ट्र सदनाचं बांधकाम थांबवण्यात येईल, असं विधान ओमर अब्दुल्लांनी केलं होतं. या विधानावर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांनी तीव्र टीका केली आहे. यावर कल्याणमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे व ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.
“मला त्यांना प्रश्न विचारायचाय की…”
“काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक महाराष्ट्राचे जातात. सर्वाधिक पर्यटन उत्पन्न काश्मीरला महाराष्ट्रातून मिळतं. तिथे महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्यटकांना त्याचा लाभ होऊ शकेल. ओमर अब्दुल्लांनी केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्रातून निषेध होत आहे. पण ज्या लोकांनी इतकी वर्षं हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण केलं, अशा लोकांना मला प्रश्न विचारायचाय. ओमर अब्दुल्ला जेव्हा म्हणाले की हे महाराष्ट्र सदन कसं काश्मीरमध्ये होतं तेच बघतो, तेव्हा त्यांना एका शब्दाने जाब विचारण्याची हिंमत तरी ठेवा”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
“अडीच वर्षं तुम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करली. आता २०२४ला आपण एकटे न पडता सत्तेत कसे येऊ या दृष्टीने तुम्ही लाचारी पत्करली आहे. महाराष्ट्रद्वेष ज्यांच्या अंगात भरलेला आहे, अशा ओमर अब्दुल्लांबाबत एक चकार शब्द त्यांनी काढलेला नाही. त्यांना ती हिंमतही होणार नाही. सावरकरांबद्दल नकारात्मक बोलणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम यांनी केलं”, अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर टीकास्र सोडलं.