गंगाखेडचे आमदार सीताराम घनदाट हे कामापुरते मामा असून, मुंबईत आल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचे सांगून कामे करून घेतात आणि इकडे जातीयवादी पक्षाचा प्रचार करीत सुटतात. अशा मतलबी माणसांपासून सावध राहा, असा टोला गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येथे लगावला.
परभणीतील आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ पाटील यांची पालम येथे बुधवारी जाहीर सभा झाली. व्यासपीठावर राज्यमंत्री फौजिया खान, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, खासदार गणेशराव दुधगावकर, माजी खासदार सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, माजी आमदार ज्ञानोबा गायकवाड, प्रताप पाटील चिखलीकर, डॉ. मधुसूदन केंद्रे, अभिजित देशमुख, प्रभाकर सिरस्कार यांच्यासह गंगाखेड मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेचे नेतृत्व कमकुवत झाले आहे. त्यामुळेच शिवबंधनाचे धागे तोडून सेनेतील नेते पक्ष सोडून जात आहेत, अशी टीका पाटील यांनी केली. धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सेना-भाजपकडून होत आहे. जातीयवादी पक्षाला पाठिंबा देऊन स्थानिक आमदाराला काय साध्य करायचे आहे, असा सवाल करून पाटील यांनी घनदाट यांच्यावर टीका केली. रामदास आठवले यांनी आंबेडकरवादी विचारांकडे पाठ फिरवली. महादेव जानकर यांना मुंडे, गडकरींनी फसवून माढा सोडून बारामतीत पराभवासाठी पाठविले आहे. मोदींचा गुजरात महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही. मोदी सत्तेवर आल्यास देश एकसंघ राहणार नाही, अशी टीकाही पाटील यांनी केली. मराठा आरक्षणाची जबाबदारी काँग्रेस-राष्ट्रवादीवर असल्याने निवडणुका पूर्ण होताच आरक्षण जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले. दुधगावकर, वरपूडकर, श्रीमती खान यांची भाषणे झाली.
सभेत सेनेचे ३ माजी खासदार
पाटील यांच्या सभेत सेनेचे ३ माजी खासदार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. हे तिघेही राष्ट्रवादीच्या प्रचारात असले, तरीही यातले रेंगे हे काँग्रेसमध्ये, तर जाधव व दुधगावकर राष्ट्रवादीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा