लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला धक्का बसला. महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला अवघी १ जागा मिळाली. तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. महायुतीच्या नेत्यांनी ४५ प्लसचा नारा दिला होता. मात्र, त्यामध्ये महायुतीला पाहिजे तेवढं यश मिळवता आलं नाही. त्यामुळे आलेल्या अपयशावर विचारमंथन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं.
महायुतीला लोकसभेमध्ये कमी जागा मिळाल्यानंतर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा करत अजित पवार गटाचे १० ते १५ आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी यावर भाष्य केलं. “आमचे सर्व आमदार आमच्याबरोबरच आहेत”, असं तटकरे यांनी म्हटलं.
हेही वाचा : “RSS मोदींना पर्याय शोधतेय, त्यांनी जबरदस्तीने…”, राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “अमित शाह यांनी…”
सुनील तटकरे काय म्हणाले?
“कुठल्याही परिस्थितीत संघटन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही आज चर्चा केली आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले, “त्या संदर्भातील चर्चा आज झालेली नाही. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील”, असं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रावादी अजित पवार गटाकडून एक राज्यमंत्रिपद आणि एक कॅबिनेट मंत्रिपद मागण्यात येत असल्याची चर्चा आहे, या प्रश्नावर सुनील तटकरे म्हणाले, “आमच्या आजच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तरामध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार निर्णय घेतील”, असं तटकरे म्हणाले.
रोहित पवारांच्या विधानावर तटकरे काय म्हणाले?
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या गटातील १० ते १५ आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, “आमचा एकही आमदार कुठेही जाणार नाही. आमचे सर्व आमदार आमच्याबरोबर आहेत. संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचे विधानं केली जातात. अशा प्रकारच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. एका निवडणुकीत जे काही वातावरण महाराष्ट्रात तयार झालं. त्यामुळे यश मिळाल्यानंतर काही माणसं हुरळून जात आहेत. मात्र, निवडणुकीच्या काळात फेक व्हिडीओ कोणी तयार केले. कशा पद्धतीने तयार केले, त्यानंतर कोणत्या मतदारसंघात प्रसारीत केले, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे, आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वार विश्वास ठेवला असून सर्व आमदार त्यांच्याबरोबर आहेत”, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.