चिपळूण : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील चिपळूण-कराड रेल्वे मार्ग लवकरच मार्गी लावण्यासाठी आपण केंद्रीय रेल्वेमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री यांची लवकरच भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व रायगड-रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सावर्डे येथे जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत चिपळूणचे माजी सभापती व अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचा  राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला. या संदर्भात मुकादम बैठकीत म्हणाले, चिपळूण-कराड रेल्वेमार्गाचा प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा फायदा होऊ शकतो. तसेच मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे ही कराड येथे एकत्र येऊ शकते. त्याचा फायदा या दोन्ही रेल्वेमार्गांना होऊ शकतो. आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण-कराड रेल्वेमार्गाच्या कामाचे ऑनलाईन पद्धतीने भूमीपूजन देखील केले होते. मात्र, त्यानंतर हा प्रकल्प प्रलंबित राहिलेला आहे.  

१०० कि.मी.चा हा प्रकल्प असून शासनावर फार मोठा आर्थिक बोजा पडणार नाही. कोकण रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाच्या वेळी हा प्रकल्प तोट्यात जाईल असे बोलले जात होते. तरीही कर्जरोखे उभारून कोकण रेल्वे प्रकल्प पुर्ण करुन आज  नफ्यात चालत आहे. याच धर्तीवर चिपळूण-कराड रेल्वे मार्ग झाल्यास भविष्यात हा मार्गदेखील फायद्यात येईल. पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादने कोकणात आणि कोकणातील उत्पादने पश्चिम महाराष्ट्रासह देशभरात जाण्यासाठी मोठा मार्ग मोकळा होईल, अशी भूमिका मुकादम यांनी या बैठकीत मांडली.

सभेनंतर पत्रकारांशी बोलताना खा. तटकरे म्हणाले, चिपळूण-कराड रेल्वे मार्गाबाबत आपण येत्या १० तारखेपर्यंत बैठकीचे आयोजन करुन स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना निमंत्रण देऊ. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले. 

हा रेल्वे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी त्याचा कसा पाठपुरावा करायचा याचा अनुभव आहे. याच अनुभवाच्या जोरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे खा. सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी सदस्य नोंदणी मोहीम जोरदार राबवण्याची सुचना कार्यकर्त्यांना दिली.

ठाकरे गटाला मोठा धक्का शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिल्यानंतर खासदार सुनील तटकरे  यांच्या उपस्थित संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या आठ सरपंचांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.