उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी पक्षाची शकलं झाली आहेत. या पक्षात उघड-उघड अजित पवार समर्थक आणि शरद पवार समर्थक असे दोन गट पडले आहेत. दरम्यान, ईडी, सीबीआयच्या कारवाईला घाबरून राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवार यांच्या गटात जाणे पसंद केले, असा दावा शरद पवार गटाकडून केला जातोय. यावरच शरद पवार गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. यासह देशात पेटीएमच्या माध्यमातून तब्बल २७ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला. भाजपावर टीका करताना त्यांनी गावातल्या लहान मुलालादेखील आता ईडी काय आहे? हे माहिती झाले आहे, अशी मिश्किल टिप्पणी केली. त्या मुंबईत राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या.
“आम्ही निवडणूक रोख्यांना विरोध केला होता”
“आठ वर्षांपूर्वी आम्ही निवडणूक रोख्यांना विरोध केला होता. मात्र भाजपाने आमच्यावर तेव्हा भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला. मी आज सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार मानते. न्यायालयाने निवडणूक रोख्यांवर बंदी घातली आहे. आज सर्वांत जास्त निवडणूक रोखे हे भाजपाकडे आहेत. निवडणूक रोख्यांचा विषय फार महत्त्वाचा आहे. या निवडणूक रोख्यांचा तपास झाला पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयच म्हणत आहे की, यात भ्रष्टाचार झालेला असू शकतो,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“सर्वांत मोठा भ्रष्टाचार हा पेटीएममध्ये झाला”
“दुसरा सर्वांत मोठा विषय हा पेटीएमचा आहे. देशातला सर्वांत मोठा भ्रष्टाचार हा पेटीएममध्ये झाला आहे. हे मी नव्हे केंद्र सरकारच म्हणत आहे. नोटबंदी करण्यात आली. सगळ्या नोटा गेल्या असा दावा केला जातो. मग तुम्ही धाड टाकता तेव्हा हे पैसे कोठून येतात. देशातील पैसे कोणीतरी वेगळंच छापत आहे का? डिजिटल पेमेंट आणण्यात आलं. यामुळे कोणीही भ्रष्टाचार करू शकणार नाही, असा दावा करण्यात आला. मात्र सर्वांत मोठा भ्रष्टाचार हा पेटीएममध्ये झाला आहे. हा भ्रष्टाचार २७ हजार कोटी रुपयांचा आहे. हे माझं मत नाहीये. मी या बातम्या वर्तमानपत्रांत वाचल्या आहेत. याच पेटीएममध्ये चीनकडून गुंतवणूक करण्यात आली,” असा दवा सुप्रिया सुळेंनी केला.
“प्रामाणिकपणा हीच माझी ताकद”
“एकीकडे चीनविरोधात लढा द्यायचा, असे सांगितले जाते. दुसरीकडे चीनचे हे पेटीएम येते. यात एक किंवा दोन नव्हे तर २७ हजार कोटींचा भ्रष्टाचार होतोय. भाजपाने याचे उत्तर दिले पाहिजे. हे २७ हजार कोटी कोणाचे आहेत, हे भाजपाने सांगितले पाहिजे. मी भ्रष्टाचाराविरोधात लढायचे ठरवले. कारण माझी सर्वांत मोठी ताकद ही माझा प्रामाणिकपणा आहे. मला त्यांची भीती वाटत नाही. मी संसदेत पूर्ण ताकदीने लढते. खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही सर्वजण संसदेत आमची बाजू मांडतो. कारण आम्हाला आयकर विभाग, सक्तवसुली संचालनालय, केंद्रीय अन्वेषण विभागाची भीती नाही,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“गावातील शेंबड्या पोरालाही ईडीबद्दल माहिती”
“१० वर्षांपूर्वी कोणालाही ईडी माहिती नव्हती. आता गावागावात ईडी काय आहे, हे समजले आहे. आज शेंबडं पोर पण म्हणतं की माझ्याशी भांडू नको नाहीतर तुझ्यामागे ईडी लावेल. मला ग्रामीण भागात विचारतात की ताई त्यांनी ईडीमुळे पक्ष बदलला का? पण मला त्यात पडायचेच नाही,” अशी मिश्किल टिप्पणी सुप्रिया सुळेंनी केली.