मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. तसंच मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील मविआच्या काळात १०९ दिवस आंदोलन करत होते. त्यावेळी तो प्रश्न मविआने सोडवला होता. आत्ताचं सरकार जालियनवाला प्रमाणे वागलं असाही आरोप त्यांनी केला. मनोज जरांगे पाटील हे मागच्या १४ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही. सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जरांगे पाटील हे आरक्षणाचा अध्यादेश येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात १०९ दिवस आंदोलन करायला बसले होते. त्यावेळी पालकमंत्री राजेश टोपे हे होते. त्यावेळी राजेश टोपे यांनी शांततेने, प्रेमाने चर्चा करून मार्ग काढला. या सरकारने मात्र जालियनवाला प्रमाणे लाठीचार्ज करून महिलांची, पुरुषांची डोकी फोडली. सरकारने चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. सरकार कशासाठी आहे? मायबाप जनतेसाठी आहे. गाड्या, हेलिकॉप्टर आणि खासगी विमानांनी फिरण्यासाठी नाही. अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.
सोमवारी सुप्रिया सुळे यांनी मंगळवेढ्याचा दौरा केला. त्यानंतर पंढरपूरलाही भेट दिली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आत्ताच्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर मराठा आरक्षणावरून टीका केली आहे. सध्याचं सरकार हे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनातून मार्ग निघत हतबल झालं आहहे. आघाडीचं सरकार असताना जेव्हा आंदोलनं झाली तेव्हा शांततेत मार्ग निघाला होता. आत्ताही सरकारने चर्चा करावी आणि हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. तसंच आम्हाला चर्चेसाठी कधीही बोलवा आम्ही तयार आहोत असंही त्या म्हणाल्या आहेत.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या आरोपांवर मात्र सुप्रिया सुळे यांनी बगल देत शिवसेना फुटल्यावर राष्ट्रवादी सत्तेत जाणार होती आणि त्यासाठी सह्यांचे पत्र तयार होते. याबाबत आपणास काहीही माहित नसून मी आमदार नाही असंही त्या म्हणाल्या.