निवडणूक आयोगाकडून निवडणूक रोख्यासंबंधीची आकडेवारी जाहीर केल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपावर आरोपांची राळ उठविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार (शरद पवार गट) सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी आवाच उचलला आहे. “लॉटरी, जुगार चालविणाऱ्या कंपन्यांकडून भाजपाला मोठ्या प्रमाणात देणगी मिळालेली आहे. या कंपन्यांनी देणगी का दिली? याची चौकशी झाली पाहीजे. एकूणच निवडणूक रोखे प्रकरणांवर श्वेतपत्रिका काढली जावी”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी बारामती येथील पत्रकार परिषदेत बोलताना केली.
संसद भाषणासाठीच असते
लोकसभेत जाऊन मोदी-शाह यांच्याविरोधात बोलण्यापेक्षा मतदारसंघात निधी आणा, अशी टीका अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली होती. आज पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी यावर उत्तर दिले. “मी सभागृहात कधीही वैयक्तिक मोदी आणि शाह किंवा भाजपावर टीका केलेली नाही. संसदेत कधीही वैयक्तिक टीका होत नाही. आमचा लढा हा धोरणांच्या विरोधात आहे. भाजपाने कांद्याची निर्यातबंदी केली, त्याविरोधात मी टीका केली होती. दूध, सोयाबिन यांना भाव मिळाला नाही. याविरोधात मी आवाज उचलला. रोजगार किती दिला, याबद्दल मी प्रश्न विचारले. ही वैयक्तिक टीका नाही”, असे प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.
ज्या व्यक्तीने ३० वर्ष लोकशाहीमध्ये काम केले, त्या व्यक्तीला संसदेवर विश्वास नाही, हे ऐकून धक्का बसला. पंतप्रधान मोदींनी याच संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन आपल्या कामाची सुरुवात केली होती. अजित पवारांचा संसदेतील भाषणावर असणारा आक्षेप चिंताजनक आणि आश्चर्यजनक आहे, अशीही टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
कोणत्या आरोपीला मोक्कातून सोडवलं?
मोक्काच्या आरोपातून एका कार्यकर्त्याला वाचविले, असे विधान अजित पवार यांनी आज बारामती येथील प्रचारसभेत केलं. याबद्दल सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला गेला. त्यावर त्या म्हणाल्या, हे गंभीर प्रकरण आहे. कुणाला मोक्का लागला होता? त्यांना का वाचविण्यात आलं? याचा सोक्षमोक्ष लागला पाहीजे. महाराष्ट्र सरकारने यावर भूमिका जाहीर करावी.