लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ चर्चेत आहे. कारण बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुप्रिया सुळेंना बारामतीतून उमेदवारी दिली. त्यानंतर पंधरा मिनिटांतच सुनील तटकरेंनी पत्रकार परिषद घेऊन बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार या सुनेत्रा पवार असतील असं सांगितलं. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. ही लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीही एका अर्थाने आहे. या सगळ्यावर आणि भाजपावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे. भाजपाने घर फोडल्याचा आरोपही केला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
महाविकास आघाडीचे मी आभार मानते, मला पुन्हा एकदा बारामतीतून लढण्याची संधी दिली. तसंच मी प्रत्येक मतदाराचे आभार मानते ज्यांनी मला तीनवेळा खासदार म्हणून लोकसभेवर पाठवलं. या भागाची लोकप्रतिनिधी होण्याची संधी द्या अशी मी विनंती मतदारांना करते आहे. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“माझ्यासाठी बारामतीचा लढा हा वैचारिक आहे. माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही. माझी लढाई भाजपाच्या चुकीच्या धोरणांशी आहे. माझं राजकारण वैयक्तिक नाही. माझ्यावर कै. यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. माझं राजकारण व्यक्ति केंद्रीत नाही तर वैचारिक आणि विकासाचं आहे.” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
देशात दडपशाही आहे, महागाई वाढली आहे. बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे. देशात वाढणारा भ्रष्टाचार हा चिंतेचा विषय आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं तर इथे पाण्याचा प्रश्न आहे. उजनी धरण, नाझरा या ठिकाणी परिस्थिती बघा. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
हे पण वाचा- सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना दिली श्रीकृष्णाची उपमा, म्हणाल्या, “श्रीकृष्णाविरोधातही भावकी..”
भाजपाने आमचं घर फोडलं
“भाजपाचे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला या निवडणुकीत शरद पवारांना हरवायचं आहे. त्यांना विकास नाही करायचा. त्यांच्याकडे उमेदवारही नाही. आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना उमेदवार म्हणून लागते आहे. याचाच विचार करा. आमची माऊली, मोठी वहिनी ही आईसमान असते. माझ्यावर जे संस्कार आहेत त्यानुसार मोठ्या भावाची पत्नी आईसमान असते. आमच्या आईला भाजपाने निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे याचा विचार करा,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.