सातारा : महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये, चित्रपट बनवताना होणाऱ्या चुकांबाबत केंद्र सरकारने कडक कायदा करावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत केली आहे. दरम्यान नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे अशीही मागणी त्यांनी या वेळी केली.
अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राविषयी आक्षेपार्ह शब्द, वक्तव्ये केली जात आहेत. महापुरुषांबाबत चित्रपट बनवताना व्यावसायिक गोष्टींच्या नावाखाली चुकीचे दाखवले जाते. याला अठकाव घालण्यासाठी केंद्राने कायदेशीर कारवाई करणारा कायदा तयार करावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकूणच जीवनकार्य आणि स्वराज्यनिर्मितीचे योगदान जागतिक स्तरावर नेण्यासाठी, भावी पिढ्यांना सतत प्रेरणा मिळण्यासाठी, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक तयार करावे अशीही मागणी त्यांनी या वेळी केली.