विश्वास पवार, वाई
सातारा जिल्हय़ात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दौरे वाढले असून, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे कार्यक्रमांना उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतात. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्याच्या वेळीही उदयनराजे पुढेपुढे करतात. पुन्हा खासदारकी मिळविण्यासाठी उदयनराजे हे कोणत्या पक्षाचा आधार घेतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
‘महिन्याभरात माझं लग्न आहे, काही महिन्यांनी या सगळ्यांचं (इतर आमदारांकडे बोट दाखवत) लग्न आहे. लोकसभेची निवडणूक आहे, अक्षता टाका, त्या वेळी संपल्या असे म्हणू नका. तुम्ही म्हणाला म्हणून टाकून दिल्या, असं म्हणू नका, अक्षता आमच्यावरच टाका अक्षतांसाठी एखादी स्कीम वगैरे काढू नका,’ हे उदयनराजेंचे वक्तव्य बरेच बोलके आहे. यातच तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातील नेत्यांनी जे निर्णय घेतलं ते आजपर्यंत कुणीही घेतले नाही. गेल्या १५ वर्षांत घोषणा भरपूर झाल्या, पण अंमलबजावणी झाली नाही. तुम्ही धाडसी निर्णय घेतले आणि अंमलबजावणी केली म्हणून तुमच्या कामाचे कौतुक करायला लागेल अशी मुख्यमंत्र्यांची उदयराजेंनी केलेली स्तुती राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जखमेवर मीठ चोळणारेच होते.
उदयनराजे यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे सुतोवाच शरद पवार यांनी मागेच जिल्हा दौऱ्यात केले होते. पण उदयनराजे यांनी अद्यापही राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. भाजपच्या पर्यायाचा विचार करीत आहेत. पण स्थानिक भाजप आणि रा. स्व. संघ उदयनराजेंबाबत समाधानी नाहीत तर साशंक आहेत तशी चर्चा पक्ष पातळीवर झाली असून ‘नको’ या एका शब्दात हे मत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. सध्या तरी सातारा जिल्हय़ात खासदार उदयनराजे काय बोलले हे गांभीर्याने घेतले जात नाही, असे चित्र दिसत आहे. ते राजे आहेत कुठेही कोणाबद्दल काहीही बोलू शकतात, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रथा रूढ होत चालली आहे. हल्ली ते फक्त चर्चेत असतात. याला तेच स्वत: आणि वेळोवेळी सतत त्यांची बदलणारी त्यांची तर्कसंगत विधानेही कारणीभूत आहेत.
उदयनराजे हे सर्वपक्षीय उमेदवार आहेत, असे चित्र निर्माण करण्याचा ते स्वत: प्रयत्न करत आहेत. माझा पक्ष कोणताही असू द्या जिल्हय़ात माझ्याएवढा लोकसभेला इच्छुक व निवडून येणारा उमेदवार नाही असाही भास ते निर्माण करत आहेत. मी घोडय़ावर असताना मला माझाच प्रचार करावा लागणार, असे मनोमन ठरवून ते कामाला लागले आहेत. त्यासाठी त्यांनी जिल्हय़ातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा सपाटा लावला आहे. जिल्हय़ात पक्षातीत संघर्ष संपविण्याचे आदेश शरद पवार यांनी सर्वाना दिले आहेत. त्याप्रमाणे सातारमध्ये उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील मनोमीलनाच्या चर्चेने सध्या जोर धरला आहे. पक्ष पातळीवर मिळतेजुळते घेतले जात आहे.