Udayanraje Bhosale on Sharad Pawar: एकेकाळी शरद पवार यांचे सहकारी असलेले खासदार उदयनराजे भोसले हे आता भाजपात आहेत. तर सातारा जिल्ह्यातील एकेकाळचे शरद पवारांचे विश्वासू सहकारी मकरंद पाटील हे आता अजित पवारांच्या बरोबर आहेत. मकरंद पाटील यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांनी आज उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी मकरंद पाटील यांच्या विरोधात आक्रमक प्रचार केला होता. त्याचा धागा पकडत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवारांकडून ती अपेक्षा नव्हती…

माध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, मकरंद पाटील आणि मी कोणत्याही पदावर नसल्यापासून आमचे मैत्रीचे संबंध आहेत. मकरंद पाटील यांनी जनसेवा करण्यासाठी अहोरात्र काम केले. पण तरीही त्यांच्याविरोधात टोकाचा प्रचार का केला? हे समजायला मार्ग नाही. शरद पवारांनी पाडा, पाडा, पाडा.. अशी भाषा वापरली. आम्हाला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

“छत्रपती शिवाजी महाराज एकट्याने काही करू शकले असते का? त्यावेळी त्यांच्याबरोबर जे मूठभर मावळे होते, त्यांच्या जोरावरच स्वराज्याची स्थापना झाली. त्याप्रमाणेच शरद पवारांनी आजवर जे केले, ते काही एकट्याचे जोरावर केलेले नाही. शरद पवारांनाही वेळोवेळी अनेक नेत्यांची साथ लाभली. पवारांची पाठराखण करणाऱ्यांमध्ये लक्ष्मणराव तात्या (मकरंद पाटील यांचे वडील) हेही एक होते. पण तरीही मकरंद पाटील यांच्याविरोधात काहीही बोलले गेले. त्यांचे काम नसते तर मी समजू शकलो असतो. पण पाटील यांचे चांगले काम आहे”, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

शरद पवार वरिष्ठ राजकारणी

शरद पवार हे राज्यातीलच नाही तर देशातील सर्वात ज्येष्ठ राजकारणी आहेत. त्यांनी आता नव्या पिढीला संधी आणि मार्गदर्शन दिले पाहीजे. शरद पवार पितृतूल्य व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी आता तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम केले पाहीजे. पण हा सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp udayanraje bhosale slams ncp chief sharad pawar over assembly election campaign kvg