शिवसेनेच्या ठाकरे गटातील प्रमुख नेते आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे देसाई कुटुंबात फूट पडल्याची चर्चा आहे. त्यानंतर ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे दीपक सावंत यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर आता ठाकरे गटाकडून तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले की, “ज्यांचे हात बरबटलेले आहेत तेच लोक शिंदेसोबत जातात. दीपक सावंत असतील किंवा भूषण देसाई असतील, ज्यांचे हात बरबटलेले आहेत तेच असा मिंदेपणा करून पक्षाला सोडून जातात. आमच्यासारखे करोडो लोक स्वतःला वाहून घेऊन शिवसेनेसोबत निस्र्वार्थ भावनेने काम करतात. हे शिवसैनिकच आमची खरी संपत्ती.”
हे ही वाचा >> “मला माफ करा योगीजी”, एन्काऊंटरच्या भीतीने बाइकचोर हातात पोस्टर घेऊन थेट पोलीस ठाण्यात दाखल
बंडखोर नेत्यांविरोधात राऊत आक्रमक
पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्या आणि शिंदे गटाची वाट धरणाऱ्या नेत्यांविरोधात आक्रमक होत विनायक राऊत म्हणाले की, “अशा या भाडोत्री लोकांच्या जीवावर आमचा पक्ष नाही.” जवळपास आठ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. सोबत शिवसेनेचे ४० आमदार नेले. हे आमदार आणि भाजपाच्या पाठींब्यावर राज्यात सत्तास्थापन केली. त्यानंतरही शिवसेनेचे अनेक नेते शिंदे गटात जात आहेत.