महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य सेवा परीक्षेमध्ये या वर्षीपासून प्रत्येक विषयामध्ये ४५ टक्के गुण मिळविण्याची अट ठेवल्यामुळे या परीक्षेच्या ४४० जागांसाठी फक्त ७८८ उमेदवार पात्र ठरले आहेत. मात्र त्यामुळे एकास तीन या प्रमाणात विद्यार्थी मिळाले नसल्यामुळे आयोगाने पात्र उमेदवारांमधून एकतृतीयांश जागा भराव्यात, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.
एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या वर्षीपासून आयोगाने पात्रतेसाठी प्रत्येक विषयासाठी किमान ४५ टक्के गुण मिळविण्याची अट ठेवली होती. त्यामुळे एकूण गुण जास्त असूनही एखाद्या विषयामध्ये १ किंवा २ गुण कमी मिळाल्यामुळे अनेक उमेदवार मुलाखतींसाठी अपात्र ठरले आहेत. अनेक उमेदवारांचे एकूण गुण पात्रता यादीतील शेवटच्या उमेदवाराच्या गुणांपेक्षा जास्त आहेत. मात्र एखाद्या विषयामध्ये या उमेदवारांना ४५ टक्क्यांची अट पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे हे उमेदवार मुलाखतीसाठी अपात्र ठरले. त्यातच प्रत्येक जागेच्या मुलाखतीसाठी तीन उमेदवार पात्र ठरावेत, असा एमपीएससीच्या निवड प्रक्रियेचा संकेत आहे. त्यामुळे ४४० जागांसाठी ७८८ उमेदवारच मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.
एकास तीन या प्रमाणात उमेदवार पात्र न ठरल्यामुळे सध्या पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी एकतृतीयांश जागा भरण्यात याव्यात आणि उरलेल्या जागा पुढील जाहिरातीसाठी वर्ग करण्यात याव्यात, अशी मागणी अन्य उमेदवारांनी केली आहे.या वर्षी अनेक विषयांचे प्रश्न चुकलेले असल्यामुळे ते रद्द करण्यात आले. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे एक उत्तर चुकल्यास त्यासाठी एकतृतीयांश गुण कमी करण्यात येतात. मात्र आयोगाकडून प्रश्न चुकल्यास तो प्रश्न रद्द केला जातो.
या वर्षी प्रत्येक विषयामधील काही प्रश्न चुकल्यामुळे ते रद्द करण्यात आले होते. मनुष्यबळ विकास या विषयाचे तब्बल ११ प्रश्न रद्द करण्यात आले आहेत. चुकलेल्या प्रश्नासाठी एक गुण देण्यात यावा किंवा त्या अनुषंगाने किमान गुणांची अट शिथिल करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.