ढिसाळ कारभारामुळे कायमच चर्चेत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता पुन्हा त्याच कारभाराची पुनरावृत्ती केली आहे. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागून दोन महिने झाले परंतु उत्तीर्ण उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीच्या प्रतीक्षेत असताना आयोगाने पुन्हा एकदा उपनिरीक्षकपदांच्या पूर्व परीक्षेची तयारी केली आहे. १८ मे रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आयोगाच्या या ढिसाळ कारभाराचा फटका तीन हजार उत्तीर्ण उमेदवारांना बसला आहे.
लोकसेवा आयोगातर्फे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पोलीस उपनिरीक्षकपदाच्या ७१४ पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यात ८५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या उत्तीर्णाची गेल्या वर्षी ८ डिसेंबरला मुख्य परीक्षा झाली. त्यात तीन हजार विद्यार्थी यशस्वी झाले. या विद्यार्थ्यांच्या याद्या मुंबई येथील आयोगाच्या कार्यालयात तसेच संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आल्या. मुख्य परीक्षेचा पुढील टप्पा म्हणून या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीची तयारी सुरू केली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून आयोगाकडून या विद्यार्थ्यांना कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत. त्यातच आता १८ मे रोजी आयोगाने पुन्हा पोलीस उपनिरीक्षकपदांसाठी पूर्व परीक्षा आयोजित केली आहे. एका परीक्षा कार्यक्रमाची पूर्तता न करताच दुसरीची सुरुवात केल्याने मुख्य परीक्षेपर्यंत उत्तीर्ण झालेल्या या तीन हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. आयोगाच्या या कारभारामुळे गोंधळलेल्या या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा पूर्व परीक्षेची तयारी सुरू केली आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांनी आयोगाशी संपर्क साधला असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

Story img Loader