महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या उपशिक्षणाधिकारी पदाच्या परीक्षेतील अंतिम उत्तरसूचीत काही प्रश्नोत्तरे रद्द केली आहेत. उत्तरे संदिग्ध नसतानाही प्रश्न रद्द केल्याने उमेदवार चिंतेत आहेत. जे दोन प्रश्न रद्द करण्यात आले, त्याची उत्तरे योग्य असल्याचा दावा केला जात आहे.
थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. देशातील एकूण प्रस्तावित थेट विदेशी गुंतवणुकीच्या किती टक्के गुंतवणूक राज्यात झाली, असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचे उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार २२.९ असे आहे. पर्याय देताना पूर्णाक संख्येत २१ ते २४ टक्के अशी आकडेवारी देण्यात आली. परीक्षार्थीनी २२.९चे पूर्णाक संख्येतील उत्तर २३ टक्के असे नोंदविले. उत्तर बरोबर असतानाही हा प्रश्नच रद्द झाल्याने उमेदवारांचे नुकसान होईल, असा दावा केला जात आहे.
प्रश्नपत्रिकेत नवरत्न उद्योगांमध्ये समावेश करण्यात आलेल्या उद्योगाबाबतची विचारणा करणारा प्रश्न होता. त्यात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, भारत पेट्रोलियम, महानगर टेलिफोन लिमिटेड व वरील सर्व असे पर्याय होते. पर्याय बरोबर असतानाही प्रश्न रद्द केल्याने तो गुण वाया जाईल, अशी उमेदवारांना भीती आहे. अंतिम यादीच्या वेळी या दोन प्रश्नांचे गुण गृहीत धरण्याची मागणी होत आहे.

Story img Loader