महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरती प्रक्रियांचे अंतिम निकाल जाहीर करण्याबाबतच्या प्रचलित कार्यपद्धतीचा साकल्याने विचारून निवडप्रक्रियेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. या संदर्भात आयोगाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व भरतीप्रक्रियांकरीता सर्वसाधारण गुणवत्त यादी आयोगाच्या संकेतस्थळार प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच, बहूसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियांकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे पात्र उमेदवारांकडून पसंतीक्रम मागवून त्याच्या आधारे अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येईल.
याशिवाय, बहूसंवर्गीय पदांच्या भरतीप्रक्रिया वगळता अन्य भरतीप्रक्रियांकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येणार आहे.
निवडप्रक्रियेसंदर्भातील उपरोक्त सुधारित कार्यपद्धती सन २०२० व त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिरातींच्या प्रलंबित निकाल प्रक्रियेपासून लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.