महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २ जानेवारी रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता ह्या परिक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर झालं आहे. आयोगाने एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक १ आणि पेपर क्रमांक २ या तीनही परिक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर झालं आहे.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीकरता जाहिराती प्रसिद्ध झाल्यामुळे कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी यासाठी २ जानेवारी २०२२ रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेचा सुधारित दिनांक आता आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
राज्य लोकसेवा आय़ोगाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करत या परीक्षेच्या सुधारित दिनांकांबद्दल माहिती दिली आहे.