गेल्या ८-१० दिवसांपासून नांदेड व लगतच्या जिल्ह्यांत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नांदेड वीज परिमंडळास सुमारे ५ कोटींचा फटका बसला. काही गावांतील वीजपुरवठा अजूनही सुरळीत होऊ शकला नाही.
नांदेड परिमंडळांतर्गत नांदेड, परभणी व िहगोली या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. या तीनही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह व गारांसह पडलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार महावितरणला पाच कोटींचा फटका बसला. तीन जिल्ह्यांतील सुमारे अडीचशे ते तीनशे गावांत वीज खंडित झाली. काही गावांतील वीजपुरवठा सुरळीत झाला असला, तरी अनेक गावांतील स्थिती जैसे थे आहे.
लघुदाब, उच्चदाब वाहिनीतील सुमारे १ हजार ७०० वीजखांब नादुरुस्त झाले. सुमारे ५० किलोमीटर लांबीच्या तारा तुटून पडल्या. ५०पेक्षा अधिक रोहित्रे नादुरुस्त झाली. महावितरणचे सर्वाधिक नुकसान नांदेड, लोहा, कंधार व देगलूर तालुक्यांत झाले. परभणी, िहगोली जिल्ह्यांतही मोठा फटका बसला. या पाश्र्वभूमीवर मुख्य अभियंता आर. जी. शेख यांनी स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सहनियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवला. वीज खंडित झाली, तेथे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न अधिकाऱ्यांनी सुरू केले.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात २ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला. सध्या १५.१९ टक्के पाणीपातळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.