कामावर अनुपस्थिती, तसेच कामकाजातील अनियमिततेच्या आरोपावरून महावितरणचे घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील कनिष्ठ अभियंता दीपक रवींद्र गिरी-गोसावी यांना निलंबित करण्यात आले.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्ह्य़ातील विद्युतकामांचा आढावा घेतला. या बैठकीत गिरी-गोसावी यांच्या कामकाजाबाबत तक्रारी आल्या. बैठकीनंतर महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश काढला. पालकमंत्री बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार अर्जुनराव खोतकर, राजेश टोपे, संतोष दानवे, नारायण कुचे आदी बैठकीस उपस्थित होते.
बैठकीत बावनकुळे म्हणाले, की मराठवाडा व विदर्भातील जवळपास दोन लाख शेतकरी कृषी पंपांना वीजजोड मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी राज्य सरकार एक हजार कोटी खर्च करणार आहे. पैकी ६०० कोटी मराठवाडय़ासाठी असतील. जिल्ह्य़ातील ११ हजार विहिरींवर कृषीपंप जोडणी देण्यात येणार आहे. अतिरिक्त १०० रोहित्रे देण्यात येतील. वीजबिलाबाबत तक्रारींमध्ये लक्ष घातले जाईल. राज्यात १२ हजार गावांमधील पाणीयोजना वीजबिलाच्या थकबाकीमुळे बंद असून त्यांना पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून थकबाकीमुक्त करण्यासाठी विशेष योजना तयार करण्याच्या विचारात आहे.
बदनापूर तालुक्यातील कोळीगव्हाण येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन बावनकुळे यांच्या हस्ते झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार अरविंद चव्हाण उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, की नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी ट्रॅक्टरचा खर्च शेतकऱ्याकडून घेणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. वीज अधिकारी वा कर्मचाऱ्यांना कामासाठी पैशांची मागणी केली, तर ग्राहकांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी नोंदविल्या पाहिजेत.

Story img Loader