मुंबई : मुंबई ते नागपूर समृद्धी मार्गाचा आता नागपूर गोंदियापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. त्यानुसार नागपूर ते गोंदियादरम्यानच्या विस्तारीकरणासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यात येणार आहे. या कामासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यासाठी एक-दोन दिवसांत निविदा काढण्यात येण्याची शक्यता आहे. नागपूर ते गोंदिया असा साधारणत: १५० किमी महामार्ग असेल. हे विस्तारीकरण झाल्यास मुंबई ते गोंदिया अंतर काही तासांत पार करणे शक्य होणार आहे.

मुंबई ते नागपूर हे अंतर आठ तासांत पूर्ण करण्यासाठी ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे. ५५,३३५.३२ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यातही नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे.

हा पहिला टप्पा येत्या काही महिन्यांत वाहतुकीसाठी खुला करण्यात येण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण महामार्ग सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून त्याचा फायदा अधिकाधिक नागरिकांना, गावांना आणि जिल्ह्यांना व्हावा या दृष्टीनेही एमएसआरडीसीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गाचा जालना ते नांदेड असा अंदाजे २०० किमी विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. तर आता समृद्धी महामार्गाचा नागपूर ते गोंदिया असाही विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गाचे नागपूर ते गोंदिया असे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. नागपूर ते गोंदिया असा अंदाजे १५० किमीचा विस्तार करण्यात येणार असून हा निर्णय आता प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे याबाबत अधिक काही सांगता येणार नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास केला जाणार आहे. या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. हा अभ्यास झाल्यानंतरच हा महामार्ग नेमका किती किमी लांबीचा असेल, यासाठी किती खर्च येईल आणि यासह अन्य बाबी स्पष्ट होतील असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

..म्हणून विस्तारीकरण

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जालना ते हैदराबाद महामार्गाचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे भविष्यातील विचार करून जालना ते नांदेड विस्तारीकरण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे गोंदिया (गोंदिया सीमेपासून) ते कोलकाता महामार्गाचाही विचार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात कोलकाता ते मुंबई प्रवास करता यावा या दृष्टीने नागपूर ते गोंदिया विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.