ST Employee Strike : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केलं होतं. त्यामुळे राज्यभरातील एसटी सेवा विस्कळीत झाली होती. दरम्यान, यासंदर्भात आज मुख्यमंत्री आणि एसटी कामगार संघटना यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केलं आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या बैठकीत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजार रुपयांची वाढ करण्याचे मान्य केलं आहे. तसेच ज्यांना कर्मचाऱ्यांना गुन्हे दाखल झाल्याने बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांना पुन्हा कामावर घेण्याचंही सरकारने मान्य केलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केलं आहे.
हेही वाचा – सीबीआयकडून गुन्हा दाखल होताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत म्हणाले…
दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत त्यांना सरसकट साडेसहा हजार रुपयांची पगार वाढ दिली आहे. ज्यांच्या पगारामध्ये २०२१ साली पाच हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजार रुपयांची वाढ झालेली आहे. ज्यांना चार हजारांची वाढ दिली होती, त्यांच्या पगारामध्ये अडीच हजारांची वाढ झाली आहे. तर ज्यांना अडीच हजारांची वाढ झाली होती, त्यांच्या पगारात चार हजार रुपायांची वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, राज्यात दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या प्रवाशांचे हाल होते होते. यासंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी एसटी कर्मचारी कृती समितीबरोबर बैठकही घेतली होती. मात्र, या बैठकीत तोडगा निघू शकला नव्हता. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांबरोबर एसटी कर्मचारी कृती समिती आणि विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकी पार पडली. या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेण्यात आला आहे.