मुंबई : राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या संपाबाबत तोडगाच निघत नसल्याने अखेर महामंडळाने कठोर भूमिका घेतली. एसटीच्या रोजंदारीवरील २,२९६ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून, २४ तासांत कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा आला आहे.

एसटीमध्ये एकूण २,५८४ रोजंदारीवरील कर्मचारी असून, त्यात २९ चालक, २,१८८ चालक तथा वाहक, १८२ वाहक, ९७ सहाय्यक, ८८ लिपिक व टंकलेखक आहेत. त्यातील २,२९६ कर्मचाऱ्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक २,१०१ चालक तथा वाहकांचा समावेश आहे. चालक तथा वाहकांना कामावर रुजू करुन एसटी सेवा सुरु करण्याचा महामंडळाचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.

दुसरीकडे, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल थांबवा असे आवाहन प्रवासी संघटनांनी केले आहे. एसटी संपाचा प्रवाशांना, विशेषत: ग्रामीण भागांतील प्रवाशांना मोठा फटका बसत असल्याची खंत मुंबईतील गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांच्या मागणीला समर्थन आहे, पण संपाला नाही. राज्य सरकार, एसटी महामंडळ, विरोधी पक्ष, कर्मचारी संघटनांनी सामंजस्याने हा प्रश्न सोडवावा आणि प्रवाशांचे हाल थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची वाटचाल गिरणी कामगारांच्या संपाच्या दिशेनेच होऊ लागली आहे. सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, कर्मचारी संघटना या तिघांच्या ताठर भूमिकेमुळे  प्रवाशांचे हाल होत आहेत. कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचे हाल हे सर्वानाच माहीत असून, त्यावर राज्य सरकार व महामंडळ, संघटना, विरोधी पक्ष या सर्वानी त्वरित तोडगा काढावा आणि सर्वसामान्यांसाठी एसटी सुरु करावी, अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा सोलापूरमधील प्रवासी संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिला.

कर्मचाऱ्यांच्या लांबलेला संप आणि प्रवाशांचे होत असलेले अतोनात हाल याबाबत नाशिक प्रवासी संघाचे अध्यक्ष आणि पनवेल प्रवासी संघाचे कार्यवाह श्रीकांत बापट यांनीही संताप व्यक्त केला. यासंदर्भात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असली तरी विचारविनिमय करुन त्यावर तोडगा काढावा. शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनतेचे हाल थांबवावे, नाहीतर आंदोलन करावे लागेल, अस इशारा बापट यांनी दिला. गोरेगावमधील साई युवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कदम यांनीही कर्मचाऱ्यांची मागणी योग्य असली तरीही त्याला आता वेगळे वळण लागत असल्याचे सांगितले. मागण्यांवर सामंजस्यपणाने तोडगा निघू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न करुन संप मिटवा, अशी विनंती त्यांनी केली.

प्रवासी संघटनांचा आंदोलनाचा इशारा

प्रवाशांचे हाल होत असल्याने राज्य सरकार, विरोधी पक्ष, एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त होऊ लागला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीला पािठबा आहे, परंतु संपाला नाही, असे स्पष्ट करतानाच प्रवाशांचे हाल थांबवा, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा राज्यातील विविध प्रवासी संघटनांनी दिला आहे.

रायगडमध्ये १४० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

अलिबाग एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची चिन्ह काही दिसत नाही. त्यामुळे महामंडळाने कारवाईचा फास घट्ट करायला सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील चालक कम वाहक म्हणून रोजंदारीवर सेवेत असलेल्या १४० कर्मचारम्य़ांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना २४ तासांत कामावर हजर राहण्याचे आदेश रायगडच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिले आहेत. हे कर्मचारी एसटीच्या सेवेत कायम नसल्याने त्यांना संपात सहभागी होता येत नाही, असा दावा महामंडळातर्फे करण्यात आला आहे. यापूर्वी रायगडमधील ४१  कायम कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान एसटी सेवा बंद असल्याने प्रवाश्यांचे हाल सुरुच आहेत. एस टी कर्मचारम्य़ांच्या संपामुळे अलिबाग ते मुंबई प्रवासासाठी जल प्रवासी वाहतुकीवरचा ताण वाढला आहे. मात्र आंतर्गत वाहतुकीसाठी प्रवाश्यांना महागडय़ा सहा आसनी रिक्षांचा पर्याय स्विकारावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे तसेच पास धारकांचे यामुळे मोठे हाल होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यात एसटीचे सुमारे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संपावर असलेले ८६ एसटी कर्मचारी निलंबित

रत्नागिरी : संपामध्ये सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी रत्नागिरी विभागातील एकूण ८६ कर्मचारी आत्तापर्यंत निलंबित करण्यात आले असून १४३ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

मंत्री पातळीवर चर्चेच्या दोन फेऱ्या होऊनही गेले दहा दिवस चालू असलेल्या या संपावर तोडगा निघू शकलेला नाही. सर्व एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी संपकरी अडून बसले आहेत. त्यामुळे ही कोंडी फुटू शकलेली नाही. अशा प्रकारची  एसटी कर्मचाऱ्यांची संपाबाबत असलेली ताठर भूमिका पाहता आता शासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांविरूध्द कारवाईसाठी पावले उचलण्यात आलेली आहेत. यापैकी रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. २४ तासात कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत रत्नागिरी विभागातील एकूण ८६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केलेले आहे. त्यामध्ये गेल्या आठवडय़ातील २७ तर आता नव्याने ५९ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे एसटी विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. तर कामावर हजर होण्याच्या एसटी पशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी विभागातील १४३ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. 

Story img Loader