यंदाचा कुंभमेळा राज्य परिवहन महामंडळासाठी खऱ्या अर्थाने आर्थिक पर्वणी साधणारा ठरणार आहे. पर्वणी काळात खासगी वाहनांना नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये प्रतिबंध असल्याने भाविकांच्या वाहतुकीसाठी एसटीचा एकमेव पर्याय आहे. नाशिकहून त्र्यंबकेश्वरला ये-जा करण्यासाठी भाविकांना १०० रुपयांत पासची सुविधा उपलब्ध असली तरी तो महागडा व अडचणीचा ठरणार आहे. कुंभमेळ्यात एसटी महामंडळाने ५०० कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले असून, लाखो भाविकांच्या वाहतुकीसाठी तीन हजार बसगाडय़ांचा ताफा सज्ज आहे.
कुंभमेळ्यातील पहिली शाही पर्वणी शनिवारी असून, त्याकरीता महामंडळाने नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, धुळे व जळगाव विभागांतून एकूण तीन हजार बसगाडय़ा मागविल्या आहेत. शाही पर्वणीचा आधीचा दिवस, शाही पर्वणीचा दिवस आणि नंतरचा दिवस असे सलग तीन दिवस खासगी वाहनांना नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश बंद राहील. प्रत्येक पर्वणीला वाहतुकीचे हे र्निबध लागू राहणार आहेत.
या कालावधीत बाह्य़ वाहनतळावरून भाविकांना अंतर्गत भागात आणण्यासाठी तसेच त्र्यंबकेश्वरला ने-आण करण्यासाठी तीन हजार गाडय़ा कार्यरत राहणार असल्याची माहिती प्रादेशिक व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी दिली. राज्यातील वेगवेगळ्या भागातून मागविलेल्या गाडय़ा नियोजनानुसार त्या त्या वाहनतळांवर कार्यान्वित झाल्या आहेत. भाविकांना बाह्य़ वाहनतळावरून अंतर्गत वाहनतळावर ये-जा करताना एका बाजूसाठी प्रत्येकी ३० रुपयांचे तिकीट काढावे लागेल. हे अंतर कुठे पाच तर कुठे सात-आठ किलोमीटर आहे. कमीअधिक अंतरानुसार तिकीट न ठेवता सरसकट ही रक्कम निश्चित करण्यात आली. नाशिक-त्र्यंबकेश्वर प्रवासासाठी प्रत्येकी १०० रुपयांचा पास आहे. रात्री १२ ते दुसऱ्या रात्रीचे १२ असा या चोवीस तासासाठी तो राहणार आहे. या पासद्वारे भाविकांना ये-जा करता येईल. पण, नियमित प्रवास भाडय़ाच्या तुलनेत पासची रक्कम २० रुपयांनी अधिक आहे. तसेच भाविकांनी दिवसभरात कोणत्याही वेळी पास काढला तरी त्याची मुदत एसटीने आधीच निश्चित केली आहे. यामुळे कोणी दुपारनंतर पास काढला आणि त्र्यंबकेश्वरला पोहोचले, त्यांना तिकडून येण्यास उशीर झाला तर नव्याने तिकीट काढावे लागेल. यामुळे भाविकांनी पास काढताना पासच्या वैधतेची वेळ पाहणे महत्वाचे ठरेल.
दरम्यान, पहिली पर्वणी झाल्यानंतर लगेच तिसरा श्रावणी सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वरची प्रदक्षिणा करणाऱ्यांची संख्या मोठी असते. यामुळे त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी नाशिक शहरातून ७०० बसगाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सिंहस्थात ‘आर्थिक पर्वणी’ साधण्याचे ‘एसटी’चे नियोजन
यंदाचा कुंभमेळा राज्य परिवहन महामंडळासाठी खऱ्या अर्थाने आर्थिक पर्वणी साधणारा ठरणार आहे.
First published on: 26-08-2015 at 03:19 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msrtc target income of rs 500 crores from kumbh