MSRTC Ticket Hike for Diwali Cancelled : एसटी महामंडळाकडून दर वर्षी दिवाळीत १० टक्के भाडेवाढ केली जाते. मात्र, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. यंदा देखील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान एका महिन्यासाठी महामंडळाने एसटीची भाडेवाढ लागू केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. महामंडळाने भाडेवाढ रद्द करत एसटीच्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. राज्यभरातील प्रवाशांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.

दिवाळीत केली जाणारी हंगामी भाडेवाढ रद्द केल्यामुळे एसटी महामंडळाला मिळणारी अतिरिक्त रक्कम यंदा मिळणार नाही. मात्र, या निर्णयाचा प्रवाशांना फायदा होणार आहे. या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार होता. परंतु, आता एसटीच्या तिकीटाचे दर ‘जैसे थे’ अवस्थेत राहतील.

विमानातील हवाई सुंदरी प्रमाणे आता शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’

मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेप्रमाणेच आदरादिथ्य आणि व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीत ही घोषणा केली.

हे ही वाचा >> Mumbai Toll Free : “निवडणूक झाल्यानंतर…” टोलमाफीसाठी मोठं आंदोलन करणाऱ्या मनसेची प्रतिक्रिया

प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा

एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विकण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन १०X१० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून दिला जाणार आहे. उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.

हे ही वाचा >> Maharashtra News Live : अजित पवारांचा मोठा नेता तुतारी फुंकणार? रामराजे निंबाळकर आणि शरद पवारांमध्ये खलबतं!


मुंबईकरांना दिवाळी भेट; लहान वाहनांची एंट्री टोलपासून मुक्तता

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज (१४ ऑक्टोबर) रात्री १२ वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.