महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचा इशारा
पगारवाढीविषयी अद्यापही सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा १७ डिसेंबरजा संप अटळ असल्याचा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेने दिला आहे.
२०१२-१६ वर्षांसाठीचा कामगार करार रद्द करून या कालावधीकरिता २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यासंदर्भात परीवहन मंत्र्यांसह संबंधितांकडे ५३५०३ कर्मचाऱ्यांनी निवेदने दिली आहेत. परंतु, अद्याप या मागण्यांची दखल घेण्यात आलेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी आहेत. वाढती महागाई, कौटुंबिक अडचणी यासाठी होणाऱ्या खर्चामुळे कर्मचारी कर्जबाजारी झाले असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी म्हटले आहे. विद्युत मंडळ तोटय़ात असतानाही कामगारांना २५ टक्के पगारवाढ देण्यात आली आहे. मग एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ का मिळत नाही, असा प्रश्नही छाजेड यांनी उपस्थित केला आहे. मान्यताप्राप्त कामगार संघटना आश्वासन पूर्तीसाठी कोणतीच भूमिका घेत नाही. कामगार करार संपण्यापूर्वी एक वर्षांआधीच कराराचा मसुदा प्रशासनाला देणे बंधनकारक असताना अद्याप मसुदा देण्यात आलेला नाही, असे छाजेड यांनी नमूद केले आहे.
वीज कर्मचाऱ्यांप्रमाणे २५ टक्के पगारवाढ मिळण्यासाठी औद्योगिक कलह कायदा १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार रद्द करावा, २००० ते २०१२ या कालावधीत तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण करणाऱ्या कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना तीन वर्षे पूर्ण झालेल्या वर्षांपासून नियमित वेतनश्रेणी देवून वेतन निश्चिती करावी, कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना एप्रिल २०१२ नंतर नियमित वेतनश्रेणी देताना कराराचा फायदा द्यावा,चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांसाठी संगणकीकृत रजा व्यवस्थापन लागू करावे, करारामुळे झालेल्या वेतन निश्चितीमधील त्रुटी दूर कराव्यात, सर्व यांत्रिक कर्मचाऱ्यांना श्रेणीपध्दतीचा लाभ द्यावा, आदी मागण्यांसाठी संपाची हाक देण्यात आली आहे. एसटी कामगारांनी बेमुदत संपासाठी सज्ज राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष छाजेड यांनी केले आहे.

Story img Loader