कराड तालुक्यातील तलाव गाळमुक्त करण्याची मोहीम प्रथमच हाती घेण्यात आली आहे. सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत लघु पाटबंधारे विभागामार्फत बांधलेल्या आणि गाळाने भरलेल्या तलावातील गाळ काढण्याच्या कामास जखिणवाडी, साळशिरंबे, चिखली, गमेवाडी, खोडजाईवाडी, किवळ येथे सुरूवात करण्यात आली. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या सूचनेवरून प्रांताधिकारी शिरीष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवली जात आहे.
सध्या ठिकठिकाणच्या तलावांमध्ये गाळ व झाडवेलामुळे पाणीसाठा घटला असून, पाणीही अशुध्द राहत आहे. तलावात पाणी कमी आणि गाळ जास्त असल्याने अपेक्षित व शुध्द पाणीसाठय़ासाठी तलावातील गाळ काढून साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तलावातील पाणाीसाठय़ात वाढ झाल्यास साहजिकच भूगर्भातील पाणी पातळी वाढेल, असा अंदाज बांधला जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी शिरीष यादव, प्रभारी तहसीलदार बी. एम. गायकवाड यांनी मंडलाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येक मंडलामध्ये गाळमुक्त तलावाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तलावातील गाळ काढण्याच्या कामास ठिकठिकाणी प्रारंभ झाला आहे. साळशिरंबे येथील पाझर तलावातील गाळ मंडलाधिकारी पी. आर. जाधव, तलाठी जी. एस. धराडे यांच्या प्रयत्नातून काढण्यात येत आहे. त्यामध्ये सुमारे १ हजार ट्रॉली माती उपलब्ध होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. जखिणवाडी येथील धावटीचा दरा परिसरातील तलावाचा गाळ काढण्यास सरपंच अॅड. नरेंद्र पाटील, मंडलाधिकारी नागेश निकम, तलाठी चंद्रकांत पारवे यांच्या प्रयत्नातून कामे सुरू झाली आहेत. या तलावातून सुमारे ४०० ट्रॉली गाळ काढण्यात येणार आहे. कराड उत्तर विभागातील चिखली, खेडजाईवाडी येथे मंडल अधिकारी एस. के. घनवट आणि तलाठी एस. एस. शेख यांच्या प्रयत्नातून, गमेवाडी मंडलाधिकारी युवराज पाटील, तलाठी सर्फराज ढालाईत, तर तळबीड येथे मंडलाधिकारी घनवट व तलाठी हिंदूराव मस्के यांच्या प्रयत्नातून तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांनी लोकसहभागातून संबंधित गाळ ट्रॅक्टरद्वारे उचलण्याचे काम सुरू केले आहे. तालुक्यातील जुन्या व पडझड झालेल्या तलावातील गाळ काढल्यानंतर समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध होताना, भूगर्भातील पाणी पातळीत निश्चितपणे वाढ होईल, असा विश्वास तहसलीदार गायकवाड यांनी व्यक्त केला.
Mud free Lake campaign started in Karad
कराड तालुक्यातील तलाव गाळमुक्त करण्याची मोहीम प्रथमच हाती घेण्यात आली आहे. सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत लघु पाटबंधारे विभागामार्फत बांधलेल्या आणि गाळाने भरलेल्या तलावातील गाळ काढण्याच्या कामास जखिणवाडी, साळशिरंबे, चिखली, गमेवाडी, खोडजाईवाडी, किवळ येथे सुरूवात करण्यात आली.

First published on: 16-05-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mud free lake campaign started in karad