रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर खेड ते चिपळूण या टापूमध्ये गुरुवारी दुपारी मातीचा भराव आणि दगड वाहून आल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
यंदाच्या पावसाळय़ात कोकण रेल्वे प्रशासनाला प्रथमच या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर सुमारे तंत्रज्ञ आणि कामगारांनी घटनास्थळी पोहचून राडारोडा बाजूला केला. सुमारे तीन तासांनी, दुपारी साडेचारच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.
खेड तालुक्यातील अंजनी रेल्वे स्थानकानजीक हा प्रकार लक्षात आल्यानंतर या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. मुंबईहून निघालेल्या मत्स्यगंधा एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस दोन तासांपेक्षा जास्त काळ खेड स्थानकात अडकून पडल्या. रेल्वे रुळावर आलेली माती बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर रेल्वे यंत्रणेकडून करण्यात आले. त्यानंतर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.